महिनाभर राबून अब्जाधीश पित्याच्या मुलाने कमावले ४ हजार रुपये

By admin | Published: July 22, 2016 11:25 AM2016-07-22T11:25:25+5:302016-07-22T11:40:06+5:30

जगण्यातील संघर्ष व खरा अर्थ समजावा यासाठी गुजरातमधील अब्जाधीश व्यापा-याने त्याच्या मुलाला महिनाभर नोकरी करून पैसे कमवण्यास लावले.

For a month, the billionaire father's son earned Rs 4 thousand | महिनाभर राबून अब्जाधीश पित्याच्या मुलाने कमावले ४ हजार रुपये

महिनाभर राबून अब्जाधीश पित्याच्या मुलाने कमावले ४ हजार रुपये

Next
ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. २२ - कंपनीतील कर्मचा-यांना बोनस म्हणून कार व फ्लॅट दिल्यामुळे गुजरातच्या सूरतमधील हि-याचे व्यापारी सावजी ढोलकिया चर्चेत आले होते. ' हरे कृष्णा' डायमंड एक्स्पोर्ट्स ही त्यांची कंपनी ६ हजार कोटी किमतीची असून त्यांचा व्यवसाय तब्बल ७१ देशांमध्य पसरला आहे. देशातील अब्जाधीशांपैकी एक असलेल्या ढोलकिया यांचा एकुलता एक मुलगा द्रव्य हा मात्र महिना चार हजार रुपये कमावतो. 
२१ वर्षांचा द्रव्य ढोलकिया हा सावजी यांचा एकुलता एक मुलगा, अमेरिकेहून नुकताच एमबीए करून सुट्टीसाठी भारतात परतला होता. सावजी यांनी ठरवलं असंत तर जगातील सर्व सुख त्यांनी निमिषार्धात द्रव्यच्या पायाशी आणून ठेवली असती. मात्र तसं काहीच न करता आपल्या मुलाला पैशाची आणि कष्टाची किंमत कळावी म्हणून ढोलकिया यांनी द्रव्यला एक महिन्यासाठी घराबाहेर पडून सामान्यांप्रमाणे जीवन जगण्यास व नोकरी करण्यास सांगितले. द्रव्यनेही पित्याची आज्ञा प्रमाण मानली व अवघे ७ हजार रुपये घेऊन तो महिन्याभरासाठी कोच्चीमध्ये दाखल झाला. 
 
 आणखी वाचा :
 (विद्यापीठाने घडविले १२ अब्जाधीश)
 
' स्वत:चा चरितार्थ चालवण्यासाठी, जगण्यासाठी तुझे पैसे तुलाच कमवावे लागतील, असे मी माझ्या मुलाला सांगितले. मात्र ते करतानाही त्याला माझी वा त्याची खरी ओळख सांगता येणार नाही, मोबाईल वापरता येणार नाही तसेच एखाद्या ठिकाणी एका आठवड्याहून जास्त काळ नोकरी करता येणार नाही व  (तशीच)आणीबाणीची परिस्थिती आल्याशिवाय ते ७ हजार रुपये वापरता येणार नाहीत' अशा काही अटी मी त्याला घातल्या, असे सावजी ढोलकिया यांनी सांगितले. ' जीवन म्हणजे काय असते, गरीब लोकं कशा परिस्थितीत जगतात, कशी मेहनत करतात आणि यशस्वी होतात हे सर्व त्याला कळावे, जगण्याचा खरा अर्थ त्याला कळावा. कोणत्याही युनिव्हर्सिटीत शिकून तुम्हाला जीवनाचे हे ज्ञान मिळत नसते, तुमच्या अनुभवातूनच तुम्ही प्रगल्भ होता. म्हणूनच मी त्याला या अटी घालून पैस कमावण्यास बाहेर पाठवले' असेही ढोलकिया यांनी स्पष्ट केले. 
२१ जून रोजी द्रव्य हातात ७ हजार रुपये घेऊन बाहेर पडला आणि नोकरीच्या शोधार्थ कोच्ची येथे पोहोचला. आपल्या या एका महिन्याच्या अनुभवाबद्दल तो सांगतो, ' कोच्ची शहरात पोचल्यानंतर पहिले ५ दिवस तर माझ्याकडे ना नोकरी होती ना राहण्यासाठी कोणतीही जागा..!
मी नोकरीसाठी ६० ठिकाणी फिरलो पण तिथे मला नकारच मिळाला. सामान्य लोकांसाठी नोकरीचे काय महत्व असतं, याची जाणीव तेव्हाच मला झाली' असे द्रव्यने सांगितले. ' मी जिथे नोकरी मागण्यासाठी गेलो, तिथे मी खोटी कहाणी सांगितली. मी गुजरातमधील एका गरीब कुटुंबात जन्माला आलो आणि फक्त १२ वी पर्यंत माझे शिक्षण झाले असं मी सांगायचो. ब-याच प्रयत्नांनंतर एका बेकरीत मला पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर एक कॉल सेंटर, मग चपलांचे दुकान आणि मॅकडोनाल्ड्स अशा अनेक ठिकाणी मी काम केलं. संपूर्ण महिनाभर विविध ठिकाणी काम केल्यानंतर महिनाअखेरीस मी ४ हजार रुपये कमावले. हे सर्व करण्यापूर्वी  मला कधीच पैशांची चिंता करावी लागली नव्हती. पण कोचीतील त्या महिन्याभरात मला जेवणासाठी ४० रुपये खर्च करतानाही झगडावे लागत होते. एका लॉजमध्ये राहण्यासाठीही मला २५० रुपये भरावे लागत होते. त्या एका महिन्यानंतर मला पैशांची आणि कष्टांची खरी किंमत समजली' अशा शब्दांत द्रव्यने आपल्या भावना मांडल्या. 

 

Web Title: For a month, the billionaire father's son earned Rs 4 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.