स्वयंपाकाच्या गॅसची मासिक दरवाढ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:12 AM2017-12-29T04:12:49+5:302017-12-29T04:12:57+5:30
नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसवर (एलपीजी) दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करून अखेरीस ते पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी या गॅसच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात दरमहा चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसवर (एलपीजी) दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करून अखेरीस ते पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी या गॅसच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात दरमहा चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. त्यानुसार आॅक्टोबरपासून अशी वाढ पेट्रोलियम कंपन्यांनी केलेली नाही.
अनुदान शून्यावर येईपर्यंत दरमहा अनुदानित गॅसची किंमत जून २०१६ पासून दरमहा चार रुपयांनी वाढवावी, असे सरकारने सांगितले होते. परंतु आॅक्टोबरमध्ये सरकारने कंपन्यांना दिलेला हा आदेश मागे घेतला. अशा प्रकारे गेल्या १७ महिन्यांत एलपीजी सिलिंडरची किंमत १९ वेळा मिळून एकूण ७६.५ रुपयांनी वाढविली गेली होती. सूत्रांनुसार आॅक्टोबरपासून अनुदान कमी करण्यासाठी म्हणून अनुदानित सिलिंडरची किंमत वाढविली गेलेली नाही. तरीही किमतीत जी वाढ झाली आहे ती अन्य कारणांनी झाली आहे.
>विरोधाभास झाला दूर
एकीकडे ‘उज्ज्वला ’ योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनामूल्य स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी द्यायची, पण दुसरीकडे रिफिल सिलिंडरची किंमत मात्र वाढवत राहायचे हा विरोधाभास दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.