आर्थिक सुधारणेवर मूडीजची मोहोर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांनी व्यक्त केले समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:02 PM2017-11-17T12:02:31+5:302017-11-17T12:38:01+5:30
जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली - जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. मूडीजचे रेटिंग जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पीएमओ इंडिया या ट्विटर अकाउंटवर मूडीजच्या रेटिंगवर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या सुधारांमुळे औद्योगित क्षेत्रातील वातावरण, उत्पादन, परकीय आणि अंतर्गत गुंतवणूक वाढणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेला मजबूती येऊन वाढ होईल, असा विश्वास मूडीजने व्यक्त केला आहे. तर मोदी सरकारने आर्थिक सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे प्रतिबिंब मूडीजने भारताच्या वाढललेल्या पतमानांकनामध्ये दिसले आहे, असे अमित शहा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Moody's believes that the @narendramodi Government's reforms will improve business climate, enhance productivity, stimulate foreign and domestic investment, and ultimately foster strong and sustainable growth. @MoodysInvSvc
— PMO India (@PMOIndia) November 17, 2017
मूडीजने भारताचे वाढवलेले पतमानांकन गुजरात निवडणुकीदरम्यान भाजपासाठी सुचिन्ह ठरण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे देशातील उद्योगधंदे डबघाईस आले असल्याचा आरोप करत काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मोदी सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. मात्र मूडीजसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताचे पतमानांकन वाढवल्याने भाजपाला विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे.
आंतरराष्ट्रीय रेटिंग्ज एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने 'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे.
India’s largest ever increase in Ease of Doing Business rankings, Pew study ascertaining PM @narendramodi ji’s popularity, Moody’s upgrade are all reflections of Modi Govt’s hard-work and reform process.
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2017
या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2 करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.
"भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Moody's believes that Modi Govt’s reforms will improve the business climate, enhance productivity, attract more investment & put India on a higher growth trajectory.
— Amit Shah (@AmitShah) November 17, 2017
जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला, अशी सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला या मुद्यावर गेले वर्ष धारेवर धरले असताना 'मूडीज्'ने वाढवलेले रेटिंग सरकारला दिलासादायक ठरणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात निवडणुकांमध्ये याचा उपयोग नरेंद्र मोदी यांचे सरकार निश्चितच या मुद्याचं उपयोग करुन घेईल. याआधीही उद्यम सुलभतेत भारताने उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल केंद्र सरकारला जगातिक संस्थांची शाबासकी मिळाली आहे.
दरम्यान, मूडीजच्या अहवालाचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहे. सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्सने 381 अंकांची उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 109 अंकांची वाढ झाली. 400 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 33,520 अंकांवर पोहोचला होता.