चंद्र अन् नोकऱ्या; अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?, जाणून घ्या...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 09:05 AM2023-09-03T09:05:41+5:302023-09-03T09:05:48+5:30
चंद्रयान-१ ने सर्वप्रथम चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली होती.
भारताच्या चंद्रयान मोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर जगभरात चंद्र हा चर्चेचा विषय ठरला. आजवर चंद्राबाबत झालेले संशोधन आणि आता इस्रोने चंद्रावर उपलब्ध असलेल्या विविध रासायनिक घटकांबाबत जारी केलेल्या माहितीवरून चंद्रकेंद्रित अर्थव्यवस्था नव्याने उभारी घेत आहे.
काय आहे आर्थिक महत्त्व?
चंद्रयान-१ ने सर्वप्रथम चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली होती. आता चंद्रयान-३ ने तेथे ऑक्सिजनसह गंधक, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, टिटॅनियम, क्रोमियम, मँगनीज, सिलिकॉन आदी धातूंचे अवशेष सापडल्याचे म्हटले. तत्पूर्वी चंद्रावर हायड्रोक्झिलचे पुरावे आढळल्याने ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा उत्तम स्रोत असून त्याचा रॉकेट फ्यूएल म्हणून वापर होतो. अणुऊर्जेचा उत्तम पर्याय असलेला हेलियम चंद्रावर मोठ्या प्रमाणात असल्याचे नासाने म्हटले होते. स्कॅंडियम, येट्रियम, टिट्रियमसारख्या धातूंमुळे डिजिटल क्षेत्राला बळ मिळेल. हे सर्व घटक पृथ्वीवर कसे आणता येतील, त्यावर सध्या अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे.
अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?
अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या अवकाश मोहिमा कमी खर्चात होते. त्यातच भारताने चंद्रमोहीम यशस्वी केल्याने अनेक देशांकडून अधिक संशोधनासाठी भारतासोबत करार करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. त्यातून देशात मोठी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. अवकाश क्षेत्रात सखोल संशोधनासाठी उच्च कौशल्याधारित मनुष्यबळाची मोठी आवश्यकता असते. उदा. इस्रोही त्यांच्या मोहिमांसाठी विज्ञान- अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक कंपन्यांसोबत एकत्रित काम करते. देशात अवकाश संशोधनात केवळ इस्रोच नव्हे, तर सुमारे १४० हून नोंदणीकृत स्टार्टअप कंपन्या कार्यरत आहेत. त्यात स्कायरूट, सॅटशुअर, ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स आदी कंपन्या कार्यरत आहेत.
चंद्रावर नाही कुणाचा हक्क
२७ जानेवारी १९६७ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने केलेल्या ठरावानुसार, कोणताही देश चंद्रावर हक्क सांगू शकत नाही. मात्र, संशोधन करण्यास कोणालाही आडकाठी नाही.
चंद्रावर मानवी मोहीम कधी?
नासाने शेवटची चंद्रावरील मानवी मोहीम १९७२ मध्ये अपोलो १७ ही राबवली होती. आता नासा पुन्हा एकदा २०२४ च्या अखेरपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी मोहीम राबवणार आहे.