Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेचा हिरो; स्वतः जखमी झाला पण 60 लोकांचा जीव वाचवला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:44 PM2022-11-01T13:44:08+5:302022-11-01T13:46:48+5:30
Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत सूमारे 135 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Gujarat Morbi Bridge Collapse:गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत सूमारे 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. दुर्घटनेवेळी पुलावर जवळपास 500 लोक होते. यातील अनेकांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेवेळी एका तरुणाने मोठे शौर्य दाखवत 60 लोकांचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, दुर्घटनेवेळी हा तरुण त्या पुलावरच होता.
60 लोकांचा जीव वाचवला
30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास मोरबी शहरातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला ऐतिहासिक पूल अचानक नदीत कोसळला. अपघाताच्या पाच दिवसांपूर्वीच हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवार असल्याने पुलावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी अचानक पूल तुटल्याने सगळे नदीत पडले. यावेळी पुलावर असलेल्या नईम शेख नावाच्या जीगरबाज तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालत सूमारे 60 लोकांचा जीव वाचवला.
I express my condolences to the bereaved families of the victims of the #Morbi incident. May the affected families find the strength to go through the pain: Gujarat CM Bhupendra Patel at 'Mangarh Dham Ki Gaurav Katha' program in Banswara, Rajasthan pic.twitter.com/tiqPj1KjPj
— ANI (@ANI) November 1, 2022
नईम मित्राला वाचवू शकला नाही
अपघातात नईम स्वतःही जखमी झाला होता. पण, त्याने आपल्या मित्रांसह 50-60 लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अपघातातील जखमींना सध्या मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नईमदेखील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. नईमने सांगितले की, अपघाताच्या वेळी तो त्याच्या 5 मित्रांसह पुलावर उपस्थित होता. या घटनेत त्याच्या एका मित्राचाही मृत्यू झाला.
राज्यभरात दुखवटा जाहीर
गुजरात सरकारने मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी शोक जाहीर केला आहे. या दुर्घटनेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 2 नोव्हेंबर रोजी राज्यात राष्ट्रीय ध्वज अर्धवट राहील आणि कोणताही सरकारी समारंभ होणार नाही.