मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:43 AM2022-11-03T05:43:18+5:302022-11-03T05:43:38+5:30
या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे.
मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटना ही देवाची इच्छा होती, अशा शब्दात या पुलाच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या ओरेव्हा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेख यांनी न्यायालयात आपले मत व्यक्त केले. या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे. यात १३५ लोकांचा मृत्यू झाला होता.फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अहवालाचा हवाला देत पांचाळ यांनी न्यायालयाला सांगितले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नवीन पृष्ठभागाच्या वजनामुळे पुलाची मुख्य केबल तुटली.
मुख्य आरोपींना वाचविले?
राज्य सरकार मुख्य आरोपींना वाचविण्याचा आणि ओरेवा येथील सुरक्षारक्षक, तिकीट विक्रेते आणि खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.
१५० वर्षे जुन्या केेबल?
नेमके किती यामध्ये बेपत्ता आहेत, हे सांगणे अद्यापही अवघड आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करूत, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एन.के. मुछार यांनी सांगितले. ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करण्याचे काम ओरेवा ग्रुप या कंत्राटदाराने १५० वर्षे जुन्या केबल्स का बदलल्या नाहीत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.
कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू?
माझं कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू? अशी भावना मोरबी पूल दुर्घटनेत कुटुंब गमावलेल्या ६० वर्षीय हेमंतभाई परमार यांनी व्यक्त केली आणि उपस्थितांच्या मनात कालवाकालव झाली. मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोरबी शहरापासून ३० किलोमीटरवर असलेल्या नाना खिजाडिया गावात त्यांच्या घरी भेट दिली आणि १६ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. परमार यांनी पूल दुर्घटनेत त्यांचा धाकटा मुलगा गौतमभाई (वय २७), सून चंद्रिकाबेन आणि त्यांचे नऊ आणि पाच वर्षांचे दोन नातू गमावले.
कंपनीचे मालक गायब
दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या ओरेवा ग्रुपच्या २ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली, परंतु मालक मात्र बेपत्ता आहेत. ओरेवाचे एमडी जयसुखभाई पटेल यांनी नूतनीकरण केलेला पूल किमान आठ ते दहा वर्षे टिकेल, असा दावा केला होता. दुर्घटनेनंतर ते गायब आहेत. कार्यालयाला कुलूप असून, तेथील सुरक्षारक्षकही गायब आहेत.