धर्म बदलून शंभरहून अधिक अल्पवयीन मुलांची पॅरिसला रवानगी
By admin | Published: April 28, 2017 03:48 AM2017-04-28T03:48:42+5:302017-04-28T03:48:42+5:30
पंजाबच्या अमृतसर भागातील अल्पवयीन मुलांना जात, धर्म बदलून पॅरिसला पाठविल्यासंदर्भात आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मुंबई : पंजाबच्या अमृतसर भागातील अल्पवयीन मुलांना जात, धर्म बदलून पॅरिसला पाठविल्यासंदर्भात आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्या चौकशीत शंभरहून अधिक मुलांना अशा प्रकारे पॅरिसला पाठवल्याचे समोर आले आहे. सुनील नंदवानी (५३), नरसैया मुंजली (४५) अशी आरोपींची नावे आहेत.
पंजाबच्या अमृतसर भागातल्या चार अल्पवयीन मुलांना (१४ ते १८ वयोगट) पॅरिसला पाठवण्याची तयारी सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या जबरी चोरी दरोडाविरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर या टोळीच्या साथीदारांना अटक केली. त्यांच्या चौकशीत या मानवी तस्करीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात आरिफ फारुकी (३८), राजेश पवार, फातिमा अहमद या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत नंदवानी आणि मुंजलीची नावे समोर आली. त्यानंतर बुधवारी या दोघांनाही मोबाइल लोकेशनवरून अटक करण्यात आली. नंदवानी हा कल्याणचा रहिवासी आहे. तर मुंजली नालासोपारा येथे राहतो. नंदवानी याने नुकतीच पाच ते सहा मुलांची पॅरिसला रवानगी केली होती. त्यात आणखी दोन मुलांना तो फ्रेंच व्हिसाच्या आधारे बाहेर पाठविण्याच्या तयारीत होता. मात्र, पासपोर्टचे काम न झाल्याने त्याचा प्रयत्न फसला. नंदवानी व मुंजली या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरिफच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मानवी तस्करी करणारे दलाल मोठ्या प्रमाणावर आहेत. अमली पदार्थाच्या वाढत्या प्रमाणामुळे तेथील पालकच मुलांना विदेशात पाठवतात. त्यासाठी स्वत: १० ते १५ लाख खर्च करतात. युरोपातील ओळखीच्या व्यक्तीच्या विश्वासावर ही मानवी तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. जात-धर्म, नाव चुकीचे दाखवूनही पासपोर्ट मिळतोच कसा, यासंदर्भातही आता तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)