खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या
By admin | Published: July 1, 2017 01:03 AM2017-07-01T01:03:14+5:302017-07-01T01:03:14+5:30
काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर
शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने तिथे सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या तैनात केल्या आहेत.
आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या ११५ तुकड्या होत्या. आता ती संख्या २१४ झाली आहे. ईदनंतर आणि अमरनाथ यात्रेच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली. तसेच अमरनाथ यात्रेच्या काळात भाविकांवर हल्ले होण्याचा अंदाजही अहवालात होता. त्यामुळे केंद्र सरकारने तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करतानाच, तेथील फुटीर नेत्यांना ताब्यात घ्यायलाही सुरुवात केली आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात कोणताही गोंधळ उडू नये आणि ती शांततेत पार पडावी, यासाठी गृह मंत्रालय पूर्ण खबरदारी घेत आहे. यात्रा सुरू झाली असून, ती सुरळीत व्हावी, असे प्रयत्न सर्व बाजूंनी घेतले जात आहेत. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई राहू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.