मी लष्करात असताना 100हून अधिक स्ट्राइक झाले- अमरिंदर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:40 PM2019-05-09T15:40:00+5:302019-05-09T15:41:53+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे
पतियाळाः पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिंग यांनी भाजपाच्या त्या दाव्याचा हवाला देत भाजपावर शरसंधान साधलं आहे. मोदी म्हणतात, सीमेपलिकडे जाऊन पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. पण मोदींना इतिहास माहीत करून घेण्याची गरज आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सिंग म्हणाले, भाजपाला इतिहासाची माहिती नाही. ज्याला लष्कराचा इतिहास माहिती आहे. त्याला माहितीच असेल की, आधीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राइक झाले आहेत. जेव्हा 1964 ते 1967मध्ये मी वेस्टर्न कमांडवर होतो, त्यावेळी जवळपास 100 स्ट्राइक झाले आहेत. त्यांनी फक्त त्या स्ट्राइकला सर्जिकल स्ट्राइक असं नाव दिलं आहे. आम्ही याला क्रॉस बॉर्डर रेड म्हणतो.
वर्षं 1947मध्ये कोण पंतप्रधान होतं? 1962मध्ये कोण पंतप्रधान होतं?, तसेच 1965 आणि 1972मध्ये कोण पंतप्रधान होतं?, आम्हीच पाकिस्तानचे तुकडे केले आहेत. इंदिरा गांधींनी हे सर्व केलं, परंतु त्यांनीही कधीही म्हटलं नाही की मी केलं. त्यांनी त्यावेळी फक्त एवढंच म्हटलं होतं की, भारतीय सेना आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशाची मी आभारी आहे. त्यांनी दुसऱ्यांना श्रेय दिलं. पण ही व्यक्ती म्हणते मी हे केलं?, तुम्ही कोण आहात?, ही तुमची सेना नाही. ती भारताची सेना आहे. एकतर त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे. अन्यथा ते जाणूनबुजून असं बोलत असावेत.
मला नाही माहीत ते असं का करत आहेत. त्यांना सर्व माहिती देण्यासाठी सरकार असल्याचंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी निवृत्त डीएस हुड्डा यांनीही एक दावा केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, भारतीय सेना मोदी सत्तेत येण्याच्या आधीपासूनच अशा प्रकारच्या कारवाया करत आहे.