Cyclone Fani : 200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 11:12 AM2019-05-02T11:12:12+5:302019-05-02T11:22:04+5:30
फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे.
नवी दिल्ली - भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे वेगाने सरकत असलेले 'फनी' चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत ओडिशातील दक्षिण पुरीच्या गोपालपूर आणि चांदबली भागात धडकण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) बुधवारी (1 मे) स्पष्ट केली आहे. फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या या आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून जातात.
पाटणा-एर्नाकुलम एक्सप्रेस, नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस, हावडा-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-हैदराबाद ईस्ट कोस्ट एक्सप्रेस, भुवनेश्वर-रामेश्वरम एक्सप्रेस, मुझफ्फरपूर-यशवंतपुर एक्सप्रेस, पुरी-आनंद विहार टर्मिनल नीलांचल एक्सप्रेस आणि पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्सप्रेस या गाड्या फनी चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर, पुरी येथे जाणाऱ्या सर्व गाड्या या 2 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पुरी येथून हावडा पर्यंत जाणारी गाडी तसेच हावडा येथून बंगळुरू, चेन्नई आणि सिकंदराबादपर्यंत जाणाऱ्या सर्व गाड्या 2 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि पुरी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्या 3 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Andhra Pradesh: Rain lashes Podugupadu village in coastal district of Srikakulam. It is one of the four districts in the state (other three are East, Godavari, Vishakhapatnam, Vizianagaram) expected to be affected by #CycloneFani. pic.twitter.com/tJiigNBtoY
— ANI (@ANI) May 2, 2019
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ताशी 205 कि.मी. वेगाने तसेच 175-185 कि.मी. ताशी चक्राकार गतीने वारे वाहत असून, शुक्रवारी 3 मे रोजी दक्षिण पुरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती एनडीएमएने हवामान खात्याच्या बुलेटिनच्या हवाल्याने दिली आहे.
आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 45 कि.मी. राहण्याची शक्यता आहे. काही स्थानांवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची(एनडीआरएफ)मदत चमू तसेच नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर्स तैनात असतील.
Andhra Pradesh: National Disaster Response Force (NDRF) team arrives in Ichchapuram, Srikakulam in view of #CycloneFani. pic.twitter.com/jr3UafGyBZ
— ANI (@ANI) May 2, 2019
आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक
मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पहिल्या बैठकीतील निर्णयाच्या आधारावर व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक आणि मदत योजनेंतर्गत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगालसाठी 1086 कोटींची मदत जारी केली आहे.
पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा आदेश
फनी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. ओडिशातील संपूर्ण शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येतील. हवामान विभागाने ओडिशा किनारपट्टी भागात ‘यलो वॉर्निंग’ जारी केल्यानंतर रस्ते आणि रेल्वे वाहतूक स्थगित किंवा वळती करण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे. किनारपट्टी भागात मासेमारी थांबविण्यात आली असून, लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
एनडीआरएफच्या 41 चमूंची तैनाती
आंध्र प्रदेश (8), ओडिशा(28), प. बंगाल (5) अशा 41 चमू एनडीआरएफ तैनात करणार असून, प. बंगालसाठी 13 तर आंध्र प्रदेशसाठी 10 चमू राखीव असतील. एका चमूत 45 जवान असतील.