दहशतवादी मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर 1200 काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिली AMU सोडण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:04 PM2018-10-15T12:04:40+5:302018-10-15T12:07:56+5:30
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) चर्चेत आले आहे.
अलिगढ - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी मन्नान वाणीचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर आता विद्यापीठातील 1200 काश्मीरी विद्यार्थ्यांनी AMU सोडण्याची धमकी दिली आहे. AMU च्या विद्यार्थी संघाचा माजी नेता सज्जाद सुभानने AMU प्रशासनाला एक पत्र लिहून मागण्या मान्य केल्या नाहीत तर विद्यापीठातील 1200 विद्यार्थी त्याचं शिक्षण सोडून काश्मीरमध्ये परत जातील अशी धमकी दिली आहे.
मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांचं निलंबित केले आहे. मात्र सज्जाद सुभानने अशा प्रकारे कोणतीही सभा झाली नसून केवळ काश्मीरच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्याचा दावा केला आहे. तसेच जर विद्यार्थ्यांवर असलेल्या केस मागे घेतल्या नाही तर काश्मिरी विद्यार्थी विद्यापीठ सोडून जातील असेही त्याने म्हटलं आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला होता. मात्रजम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी ( 11 ऑक्टोबर ) जवान आणि दहतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यामध्ये मन्नानचा समावेश होता. मन्नानच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात 15 विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे ही सभा घेतल्याची माहिती समोर आली होती.
याप्रकरणी विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर अन्य चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड तपासला जाणार आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेनेही या विद्यार्थ्यांना नमाज अदा करण्यापासून रोखले होते. विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष फैजुल हसन यांनी सभेच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यासाठी नमाज अदा करणे योग्य नव्हे, असे सांगत या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं होतं.