३०० कोटी ई-मेल, पासवर्ड लीक?; ऑनलाइन फोरमने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 06:11 AM2021-02-07T06:11:49+5:302021-02-07T07:43:34+5:30
ज्या वापरकर्त्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाला आहे.
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून हॅकिंगचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता ऑनलाईन फोरमने ३०० कोटींहून अधिक ई-मेल आणि पासवर्ड लीक झाल्याचा दावा केला आहे. हा सर्व डेटा एकाच ठिकाणी ठेवण्यात आला असल्याचे समजते. या लीकमध्ये लिंक्डइन, माइनक्राफ्ट, नेटफ्लिक्स, बाडू, पेस्टबिन आणि बिटकॉइन्स यांच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. ज्या वापरकर्त्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाला आहे.
सायबर न्यूजच्या एका अहवालानुसार नेटफ्लिक्स, लिंक्डइन, बिटकॉइन यांसारख्या व्यासपीठांवरून हा डेटा लीक झाला आहे. या लीकला ‘कम्पायलेशन ऑफ मेनी ब्रिचेस’,असे संबोधले जाते. लीक करण्यात आलेला ३०० कोटींहून अधिक डेटा संग्रहित करण्यात आला असून त्यास पासवर्ड सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवण्यात आला आहे.
कमकुवत पासवर्ड कारणीभूत
नॉर्डपास नावाच्या एका पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने २०२० मधील सर्वात कमजोर पासवर्डची यादी जारी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते यावर्षीही १२३४५६ हा पासवर्ड सर्वात कमकुवत पासवर्डच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एक ते नऊपर्यंतचे आकडे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पिक्चर वन हा सर्वात कमकुवत पासवर्ड आहे. अनेक लोकांनी पासवर्डचे स्पेलिंगच पासवर्ड म्हणून ठेवल्याचे आढळून आले आहे. तर अनेकांनी १२३१२३ हा पासवर्ड ठेवला आहे. यापैकी कोणताही पासवर्ड वापरकर्त्यांनी ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.