काश्मिरात आणखी ३,६०० जवान पाठविणार
By admin | Published: April 17, 2016 03:10 AM2016-04-17T03:10:25+5:302016-04-17T03:10:25+5:30
गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला.
नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. तसेच यापुढे हिंसाचारात आणखी बळी जाऊ नयेत याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारला केली.
येथे आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त दल पाठविण्याचा निर्णय झाला. राज्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जण मृत्युमुखी पडल्यानंतर काश्मीरच्या काही भागात आज चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम आहेत. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार निमलष्करी दलाच्या १२ कंपन्या आज आणि २४ उद्यापर्यंत राज्यात डेरेदाखल होत आहेत. एका कंपनीत जवळपास १०० जवान असतात.
परिस्थितीवर नजर
गृह मंत्रालय जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्यात सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे.
मोबाईल इंटरनेट सेवा बंदच
कश्मीरच्या काही भागात चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम असून संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा व्यवस्था बिघडू नये यादृष्टीने कुपवाडा आणि हंदवाडासह उत्तर काश्मीरच्या काही भागात कडक निर्बंध लागू आहेत. खबरदारी म्हणून श्रीनगरच्या काही पोलीस ठाणे क्षेत्रातही निर्बंध कायम आहेत.
पीडीपीचा आरोप
काश्मीरमध्ये अशांतता पसरली असताना काही स्वार्थी लोक हेतुपुरस्सर हिंसाचाराचा प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने (पीडीपी) शनिवारी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)