मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या, मग बुलेट ट्रेनचा अट्टहास कशाला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:30 PM2017-10-31T20:30:48+5:302017-10-31T20:52:33+5:30
मुंबई - दररोज धावणा-या मुंबई ते अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या असतात, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे.
मुंबई - दररोज धावणा-या मुंबई ते अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या असतात, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे. मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यांत 40 टक्के, तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च प्रस्तावित आहे. त्यामुळे भाजपा सरकारनं सद्यस्थितीचा अभ्यास केला नसल्याचा दावा अनिल गलगलींनी केला आहे. गलगलींनी ही माहिती पश्चिम रेल्वेच्या निदर्शनास आणून दिली आहे. 3 महिन्यांत पश्चिम रेल्वेला 29.91 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अशा 3 महिन्यांची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेने 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली.
कोणत्या ट्रेन रेल्वे प्रशासनासाठी फायदेशीर
मुंबई-अहमदाबाददरम्यान 31 मेल एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत या एक्प्रेसमधून 3 लाख 98 हजार प्रवाशांनी प्रवास केला. परंतु 7 लाख 6 हजार 446 सीट्स रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध होत्या. 15 कोटी 78 लाख 54 हजार 489 एवढं आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या पश्चिम रेल्वेला रुपये 42 कोटी 53 लाख 11 हजार 471 इतका महसूल अपेक्षित होता. पण फक्त 26 कोटी 74 लाख 56 हजार 982 एवढा महसूल प्रवाशांच्या तिकिटातून मिळाला आहे. दुरांतो, शताब्दी, गुजरात मेल, भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती यांसारख्या एक्स्प्रेसचा या गाड्यांमध्ये समावेश आहे.
मुंबई ते अहमदाबाद अशा 30 मेल एक्सप्रेसने 4 लाख 41 हजार 795 प्रवाशांनी प्रवास केला होता. प्रत्यक्षात 7 लाख 35 हजार 630 सीट्स होत्या. एकूण महसूल 44 कोटी 29 लाख 8 हजार 220 रुपये येणं अपेक्षित असताना 30 कोटी 16 लाख 24 हजार 623 रुपये एवढा महसूल मिळाला होता. म्हणजे पश्चिम रेल्वेला 14,12,83,597 एवढं आर्थिक नुकसान सोसावं लागलं.
शताब्दीमध्येही प्रवासी नाहीत
12009 शताब्दी ज्या कार चेअरसाठी प्रसिद्ध आहे, त्यात अहमदाबादला जाताना 72 हजार 696 पैकी फक्त 36 हजार 117 प्रत्यक्ष प्रवासी मिळाले होते. 7 कोटी 20 लाख 82 हजार 948 रुपयांऐवजी 4 कोटी 11 लाख 23 हजार 86 रुपये कमाई झाली होती.
Executive चेअरच्या 8 हजार 216 पैकी 3 हजार 468 सीटसवर प्रवासी होते. यातून 1 कोटी 63 लाख 57 हजार 898 ऐवजी 64 लाख 14 हजार 345 कमाई झाली होती. अहमदाबादहून मुंबईकडे परतताना 12010 या शताब्दीमध्ये 67 हजार 392 पैकी 22 हजार 982 सीट्सवर प्रवासी होते. यातून 6 कोटी 39 लाख 8 हजार 988 ऐवजी 2 कोटी 51 लाख 41 हजार 322 इतकीच कमाई झाली होती. Executive चेअरच्या 7 हजार 505 पैकी फक्त 1 हजार 469 सीट्सवर प्रवासी होते. ज्यांच्याकडून रेल्वेला 1 कोटी 45 लाख 49 हजार 714 रुपयांऐवजी 26 लाख 41 हजार 83 रुपये महसूल मिळाला होता.