केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या उपचारांसाठी 50 लाखांहून अधिक खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:39 AM2019-10-22T10:39:53+5:302019-10-22T10:40:41+5:30
भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : गेल्या चार वर्षात दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या उपचारांसाठी सरकारी तिजोरीतून 50 लाखहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. भाजपाने आरटीआयच्या माध्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे यांदर्भातील खुलासा केला आहे. यात जवळपास 25 लाख रुपये फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारांसाठी खर्च करण्यात आले आहेत. यावरुन भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक सुविधा दिल्याचा दावा करतात. तसेच, मोहल्ला क्लिनिकचे कौतुक करताना दिसतात. मग, त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांचे वैद्यकीय उपचार महागड्या अशा खासगी रुग्णालयांमध्ये का केला? असा सवाल भाजपाने केला आहे.
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितले की, आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी तिजोरीतून एकूण 12,18,027 रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडून चार वर्षांत एकूण 13,25,329 रुपये खर्च झाले. यामध्ये उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया स्वत:च्या उपचारांसाठी एक रुपया सुद्धा खर्च केला नाही. मात्र, हा सर्व खर्च त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारांसाठी करण्यात आला आहे.
गोपाळ राय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारांसाठी 7,22,558 रुपये खर्च झाले आहेत. तर इम्रान हुसैन आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारांसाठी 2,46,748 रुपये खर्च झाला आहे. सत्येंद्र जैन आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारांसाठी सर्वात कमी 60,293 रुपये खर्च झाला आहे, तर कैलाश गहलोत यांच्याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.
यावेळी मनोज तिवारी म्हणाले, "कोणालाही, कधीही, कसलाही आजार होऊ शकतो. यासाठी प्रत्येक जण चांगले उपचार घेण्यास इच्छुक असतो. त्यामुळे भाजपा याविरोधात नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे की, त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी कोणत्या आजारासाठी आणि कुठे उपचार केले? असा कोणता आजार होता की, त्या आजारावर दिल्लीतील सरकारी रुग्णालयांत उपचार करणे शक्य नव्हते?"