50 टक्क्यांहून अधिक तरुण मित्रांमध्ये 'कूल' दिसण्यासाठी ओढतात सिगारेट - सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 12:51 PM2017-12-05T12:51:21+5:302017-12-05T12:53:18+5:30
देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे.
नवी दिल्ली - देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे. तर 90 टक्के तरुणांनी सांगितलं आहे की, जर त्यांच्या आई-वडिलांनी धुम्रपानास विरोध केला नाही तर ते धुम्रपान करणं सुरु ठेवतील. दुसरीकडे 80 टक्क्यांहून जास्त जणांचं एकदा धुम्रपान करण्यात काहीच हरकत नसल्याचं म्हणणं आहे.
सहा राज्यांमधील 1900 शाळकरी विद्यार्थी या सर्व्हेत सहभागी झाले होते. सर्व्हेत सहभागी झालेल्या 75 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की, जेव्हा कधी त्यांचे मित्र सिगारेट पिण्यासाठी आग्रह करतात, तेव्हा त्यांना नकार देणं कठीण जातं. 46 टक्के विद्यार्थ्यांनी तर आपण मित्रांमध्ये कूल दिसावं यासाठी सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्याचं कबूल केलं आहे.
'वडिलांसाठी ठीक तर मग माझ्यासाठीही'
फोर्टिज रुग्णालयाचे मनोरुग्ण विभागातील डॉक्टर समीर पारिख यांनी सांगितलं की, तरुणांमधील स्मोकिंगचं व्यसन आणि त्यांची समज जाणून घेण्याच्या हेतूने मी हे सर्व्हेक्षण केलं. यावेळी तरुण-तरुणींना काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी 87 टक्के शाळकरी विद्यार्थ्यांनी अभिनेत्यांना स्मोकिंग करताना पाहून आपल्याला स्मोकिंग करावंस वाटत असल्याचं सांगितलं. 89 टक्के मुलांनी जर स्मोकिंग करणं आपल्या वडिलांसाठी ठीक आहे तर मग आपल्यासाठीही चांगलंच असेल असं सांगितलं. 79 टक्के तरुण-तरुणींनी धुम्रपान विरोध अभियानात सेलिब्रेटी सामील झाल्याने स्मोकिंग सोडण्यास मदत मिळत असल्याचं सांगितलं आहे. तर 60 टक्क्यांहून जास्त तरुणांचा दावा आहे की, स्मोकिंगचे दुष्पपरिणाम सांगितल्यास ते थांबवण्यास मदत मिळू शकते.
दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, स्मोकिंगमुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. जगभरात 2015 मध्ये झालेल्या 64 लाख मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू स्मोकिंगमुळे झाले. भारत, चीन, रशिया आणि अमेरिकेत स्मोकिंगमुळे 52.2 टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्मोकिंगमुळे होणा-या मृत्यूमध्ये 90 टक्के मृत्यू फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतात. तर 17 टक्के मृत्यू ह्रदयाच्या रोगामुळे होतात.