महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त महिला उद्योजक; नारायण राणेंची संसदेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:47 AM2021-12-20T05:47:48+5:302021-12-20T05:49:12+5:30
सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांत २.६५ कोटी महिलांना रोजगार मिळाला असून त्यात १७.९७ लाखांपेक्षा जास्त महाराष्ट्रात आहेत.
नितीन अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांत २.६५ कोटी महिलांना रोजगार मिळाला असून त्यात १७.९७ लाखांपेक्षा जास्त महाराष्ट्रात आहेत. याशिवाय राज्यात ८ लाखांपेक्षा जास्त महिला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मालकीचीही जबाबदारी पार पाडत आहेत. या महिलांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमात २०४.८१ कोटी रुपयांची मार्जिन मनी वापरला.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात १.२४ कोटी महिला एमएसएमई उद्योगांचे स्वामित्व करत आहेत. यात महिलांत सर्वाधिक २९ लाखांपेक्षा जास्त महिला पश्चिम बंगालच्या आहेत. त्यानंतर १२.८५ लाख महिला तमिळनाडू, ९.७२ लाख, ९.३६ लाख कर्नाटक, ८.६२ लाख उत्तर प्रदेश, ८.३८ लाख आंध्र प्रदेश आणि ८.२६ लाख गुजरातमध्ये एमएसएमई उद्योग चालवत आहेत. एकूण २.६४ कोटी महिला कामगारांमध्ये सर्वाधिक ४३.५० लाख पश्चिम बंगाल, ३२.२६ लाख तमिळनाडू, २७.२७ लाख उत्तर प्रदेश, २१ लाख आंध्र प्रदेश, १९.७३ लाख कर्नाटक आणि १५.२४ लाख तेलंगणमध्ये काम करत आहेत.
राणे म्हणाले...
योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांनी एकूण ६५७४ प्रकल्पांत २०४.८१ कोटी रुपयांच्या मार्जिन मनीचा वापर केला. चालू आर्थिक वर्षात ७१५ प्रकल्पांसाठी ३१.४२ कोटी आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १,१७९ प्रकल्पांत ३६.४८ कोटी रुपयांपेक्षा जास्त मर्जिन मनीचा वापर झाला, असे राणे यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.