‘पेलेट’बंदी घातल्यास अधिक मृत्यू
By Admin | Published: August 20, 2016 01:23 AM2016-08-20T01:23:38+5:302016-08-20T01:23:38+5:30
काश्मीर खोऱ्यातील हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेलेट गनवर (छर्ऱ्यांची बंदूक) बंदी घालण्यात आली, तर बेकाबू परिस्थितीत जवानांना नाईलाजाने
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेलेट गनवर (छर्ऱ्यांची बंदूक) बंदी घालण्यात आली, तर बेकाबू परिस्थितीत जवानांना नाईलाजाने गोळ्या चालवाव्या लागतील आणि त्यामुळे अधिक मृत्यू होतील, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) शुक्रवारी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाला सांगितले.
सीआरपीएफकडील उपलब्ध पर्यायांतून पेलेट गनचा पर्याय काढून घेण्यात आला, तर अशांत आणि दंगलीच्या परिस्थितीत आणि हिंसाचाराच्या काळात सीआरपीएफ जवानांना रायफलीतून गोळ्या चालवाव्या लागतील आणि त्यामुळे अधिक लोकांचा बळी जाण्याची भीती आहे, असे सीआरपीएफने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.
न्यायालयात दाखल याचिकेवर सीआरपीएफने शपथपत्राच्या माध्यमातून म्हणणे मांडले. काश्मीर खोऱ्यात जमावावर नियंत्रणास पेलेट गनचा वापर करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
अचूक नेम लावणे अनेकदा शक्य होत नाही
हिंसाचारादरम्यान सशस्त्र दले आणि निदर्शक दोघेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत असल्यामुळे स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळणे कठीण होते. टोकाच्या स्थितीत जमावाला आवर घालण्यासाठी शस्त्र वापरण्याची वेळ आलीच तर समोरच्यांच्या छातीखालील भागांवर मारा करावा, असे एसओपी सांगते; परंतु हिंसक निदर्शक, त्यांचे अस्थिर असणे यामुळे अचूक नेम लावणे अनेकदा शक्य होत नाही, असे सीआरपीएफने सांगितले.