तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 02:01 PM2022-04-23T14:01:35+5:302022-04-23T14:02:25+5:30
अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये नोंदलेल्या ५४,५४७ कोविड मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील होते.
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ६१ ते ७० वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव असलेल्या तिसऱ्या लाटेत मात्र या वयोगटात किंचितसा बदल झाला आहे. तिसऱ्या लाटेत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील तब्बल २८.११ टक्के मृत्यू हे ७१-८० वयोगटातील असल्याचे समोर आले.
अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये नोंदलेल्या ५४,५४७ कोविड मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील होते. २०२१ वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ८८,९१५ मृत्यूंपैकी जवळपास २७.५ टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातीलच होते. त्यानंतर जानेवारी ते मार्च २०२२ पर्यंतच्या २,३३७ मृत्यूंपैकी २८.११ टक्के मृत्यू ७१-८० वयोगटातील आणि ६१-७० वयोगटातील मृत्यू या काळात २३ टक्क्यांपर्यंत कमी झाले. २०२० आणि २०२१ मध्ये ७१-८० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण १९.८७ टक्के व १७.८ टक्के होते. तेच २०२२ मध्ये वाढलेले दिसले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन या प्रकाराचा प्रादुर्भाव अधिक दिसला. बहुसंख्य आणि गंभीर अन्य आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा तसेच ७१ ते ८० वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी ६१-७० वर्षे वयोगटाच्या तुलनेत ७१ ते ८० वयोगटातील लोकांवर अधिक परिणाम झाल्याचे ते सांगतात.
- डॉ. अविनाश सुपे, कोविड-१९ मृत्यू लेखापरीक्षण समितीचे प्रमुख
तत्काळ लसीकरण पूर्ण करा -
सेव्हन हिल्स रुग्णालयातील एका तज्ज्ञ डॉक्टरने सांगितले, तिसऱ्या लाटेत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये ७० हून अधिक वयोगटातील रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यातील अनेकांना प्रामुख्याने अतिदक्षता विभागात दीर्घकाळ उपचार करण्यात आले. त्यामुळे अशावेळी या वयोगटात मृत्यूची शक्यता जास्त होती. कोविड रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्यांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे आणि संसर्गापासून दूर राहण्यासाठी वर्धक मात्रा घेणे आवश्यक आहे.