CoronaVirus News: कोरोना लसीच्या चाचण्यांत पुरुषांपेक्षा महिला स्वयंसेवक अधिक; भारत लसीचे मोठे उत्पादन केंद्र बनणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:26 AM2020-07-24T01:26:48+5:302020-07-24T06:21:08+5:30

एम्सचे डॉ. संजय राय यांची मुलाखत

More female volunteers than men in corona vaccine tests | CoronaVirus News: कोरोना लसीच्या चाचण्यांत पुरुषांपेक्षा महिला स्वयंसेवक अधिक; भारत लसीचे मोठे उत्पादन केंद्र बनणार

CoronaVirus News: कोरोना लसीच्या चाचण्यांत पुरुषांपेक्षा महिला स्वयंसेवक अधिक; भारत लसीचे मोठे उत्पादन केंद्र बनणार

Next

- एस.के. गुप्ता

नवी दिल्ली : भारत कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचे जगातील मोठे केंद्र बनणार आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असणार आहे. या मानवी चाचण्या सुरू झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष सहा आठवड्यांच्या आत हाती येतील, असे एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
देशामध्ये कोरोनाची लस बनविण्यासाठी संशोधन सुरू आहे. या लसीच्या मानवी चाचण्या पार पडण्याची जबाबदारी एम्सने डॉ. संजय राय यांच्यावर सोपविली आहे. लसीच्या परीक्षणासंदर्भात त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभव या संशोधनासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.

कोरोना लस बनविण्याच्या प्रयोगात एम्सची भूमिका किती महत्त्वाची आहे, या प्रश्नावर डॉ. संजय राय यांनी सांगितले की, देशातील एम्ससह १२ संस्था कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्या घेणार आहेत. भारतात रुग्णांना देण्यात येणाऱ्या लसीच्या नमुन्याचे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे.  मानवी चाचण्यांच्या पहिल्या व दुसºया टप्प्यात देशामध्ये १,१२५ जणांना ही लस टोचण्यात येईल. त्यातील ३७५ लोकांवर एम्सकडून आणखी प्रयोग केले जातील. या मानवी चाचण्यांच्या पहिल्या दोन टप्प्यांची प्रक्रिया सहा आठवडे चालेल. त्यानंतरच मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू होईल.

या चाचण्यांचे सुरुवातीचे निष्कर्ष सकारात्मक आले व या चाचण्या वेगाने जरी पार पाडल्या तरी ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान सहा महिने लागतील. त्याआधी अन्य कोणीही कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढली, तर भारत हा त्या लसीचा सर्वात मोठा उत्पादक देश बनू शकतो. ते म्हणाले की, भारतातील कोरोना विषाणू हा इतर देशांतील कोरोना विषाणूपेक्षा कमी घातक आहे. त्यामुळेच भारतातील मृत्यूदर कमी आहे, असे काही तज्ज्ञ म्हणत आहेत. मात्र, भारतातील कोरोना विषाणू कमी घातक आहे, असा एकही पुरावा अद्याप आम्हाला मिळालेला नाही.

डॉ. संजय राय यांनी सांगितले की, केंद्रीय औषध नियंत्रकांनी देशातील दोन कंपन्यांना सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या करण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेक व झायडस कॅडिला, अशी त्या दोन कंपन्यांची नावे आहेत. एकाही विदेशी कंपनीला त्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या भारतात करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मानवी चाचण्या या सुरक्षित व परिणामकारक पद्धतीने पार पाडाव्या लागतात.

शरीरात लस टोचल्यानंतर विषाणूशी लढण्याकरिता अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार होतात, याचे निरीक्षण केले जाते. जर अँटिबॉडी तयारच होत नसतील, तर मग त्या प्रयोगांना काहीच अर्थ उरणार नाही. मग लसीच्या प्रयोगांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. लसीच्या प्रयोगांमध्ये असे काही वेळा होत असते.

असे निवडले जातात मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवक

मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवक निवडले जातात, त्या प्रक्रियेबद्दल एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, मानवी चाचण्यांसाठी १८ ते ५५ वर्षे वयोगटातील व कोणताही आजार नसलेल्या व्यक्ती स्वयंसेवक म्हणून निवडल्या जातात. त्यांना प्रयोगात सामील करून घेण्यापूर्वी त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

देशातील कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांकरिता निवडलेल्या स्वयंसेवकांना या लसीचा पहिला लहान प्रमाणातील डोस गुरुवारपासून देण्यास सुरुवात झाली. ५० लोकांना लसीचा कमी प्रमाणातील डोस, तर काही जणांना डबल डोस देण्यात येईल. त्यानंतर १४ दिवसांनी या व्यक्तींच्या शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या याचे परीक्षण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. कारण अँटिबॉडीज तयार होण्यासाठी २ ते ४ आठवड्यांचा वेळ लागतो. ज्या वैद्यकीय संस्थांमध्ये क्लिनिकल फार्माकॉलॉजी विभाग आहे, अशाच १२ संस्थांना इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या मानवी
चाचण्या करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

10,000 लोकांनी एम्सकडे केले अर्ज

कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे, असे एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय म्हणाले. त्यांनी सांगितले की, लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये स्वेच्छेने सामील होण्यासाठी आठ ते दहा हजार लोकांनी दिल्लीतील एम्सकडे अर्ज केले आहेत. त्यातील साडेतीन हजार लोकांना आम्ही ई-मेलद्वारे उत्तर दिले, तर अन्य 10 ते 15 % लोकांना आम्ही व्हॉटस्अ‍ॅपवरून किंवा दूरध्वनी करून उत्तर दिले.

‘कोरोना विषाणूत मोठे बदल झाले नाहीत’

कोरोना विषाणूच्या स्वरूपात वारंवार बदल होतात, असे म्हटले जाते. त्यामुळे सध्या शोधल्या जात असलेल्या लसी किती परिणामकारक ठरतील, या प्रश्नावर डॉ. संजय राय यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या स्वरूपात कोणतेही मोठे बदल आढळून आलेले नाहीत. या विषाणूने सहा सात वेळा आपले स्वरूप बदलले, असे म्हटले जात आहे. इतके कमी बदल इन्फ्लुएंझासारख्या मोठ्या संसर्गजन्य रोगांच्या विषाणूंतच आढळून येतात. कोरोना विषाणूबद्दल सध्या जे बोलले जात आहे, त्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

Web Title: More female volunteers than men in corona vaccine tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.