मुंबई हल्ल्यांच्या तुलनेत अधिक कुुशल प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 12:34 AM2016-01-05T00:34:07+5:302016-01-05T00:34:07+5:30
पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे.
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे. प्रशिक्षित लष्कराने त्यांना प्रशिक्षण दिले असावे हे त्यांच्या हल्ल्याच्या तंत्रावरून स्पष्ट होते. अतिरेक्यांनी मुरलेल्या लढवय्यांप्रमाणे तंत्र वापरत अधूनमधून चकमक सुरू ठेवण्यावर भर देताना आपल्याकडील दारूगोळ्याचा साठा राखून ठेवला होता. हल्ल्यासाठी त्यांनी पहाटे ३ वाजतादरम्यान सुरक्षेचा स्तर सर्वात कमी असतानाची वेळ निवडली.
सर्व हल्लेखोर मारले गेले असा संभ्रमही त्यांनी निर्माण केला. हे सर्व तंत्र पाहता त्यांना लष्कराकडून प्रशिक्षण मिळाल्याचे संकेत मिळतात. लगतच्याच गुलपूर संबोली मार्गावर अतिरेक्यांनी टोयोटा इनोव्हाचा चालक इकदारसिंग याचे वाहन पळवत त्याची हत्या केली. हे स्थळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे.
बीएसएफला अहवाल मागितला...
पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल अहवाल सादर करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. सशस्त्र अतिरेक्यांना भारतीय हद्दीत प्रवेश कसा शक्य झाला याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा भेदण्याच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)