आणखी भव्यदिव्य... ७० नाही; १०७ एकर जागेवर श्रीराम मंदिर; ट्रस्टने विकत घेतली ७,२८५ स्वे. फूट जमीन
By महेश गलांडे | Published: March 4, 2021 01:21 PM2021-03-04T13:21:21+5:302021-03-04T13:22:57+5:30
श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आम्हाला आणखी जमीन आवश्यक आहे, त्यामुळे ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे ट्र्स्टी अनिल मिश्रा यांनी म्हटलंय. अशरफी भनवजवळ ही जमीन आहे.
मुंबई - अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदीर उभारण्यासाठी मंदीर ट्रस्टकडून गतीमान हालचाली सुरू आहेत. मंदीर उभारणीसाठी फंड जमा करण्यापासून ते मंदीराचा विस्तार किती एकर जागेवर करायचा, इथपर्यंत सर्वकाही विचाराधीन आहे. त्यानुसारच, येथील राम मंदिराचा विस्तार आता 70 एकरवरुन 107 एकरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यासाठी, राम जन्मभूमी तिर्थक्षेत्रने राम जन्मभूमी परिसरात 7,285 वर्ग फूट जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या खरेदीसाठी 1373 रुपये प्रति वर्ग फूटच्या दराने एक कोटी रुपयेही देण्यात आले आहेत.
श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आम्हाला आणखी जमीन आवश्यक आहे, त्यामुळे ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे ट्र्स्टी अनिल मिश्रा यांनी म्हटलंय. अशरफी भनवजवळ ही जमीन आहे. फैजाबादचे उप-विभागीय एसबी सिंह यांनी सांगितले की, जमिनीचे मालक दीप नरैन यांनी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्याकडे 7285 वर्ग फूट जमिनीच्या दस्तावेजची नोंदणी केली आहे, 20 फेब्रुवारी रोजी हस्ताक्षरही झाले. मिश्रा आणि अपना दल पक्षाचे आमदार इंद्र प्रताप तिवारी यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरीही केली. फैजाबादच्या उप-विभागीय नोंदणी कार्यालयात एसबी सिंह यांच्यासमोरच हा कागद करण्यात आला.
राम मंदिर ट्रस्टद्वारे पहिल्यांदाच जमीन खरेदीच्या प्रकियेचा भाग बनता आले, ते भाग्य मिळालं याचा आनंद आहे, असे तिवारी यांनी म्हटले. विशेष म्हणजे ट्रस्टमधील काही सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार मंदिर परीसरातील आणखी जमीन, मंदिरे, घरे, मैदानांच्या मालकांना भेट घेऊन आणखी जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीनुसार, ट्रस्ट विस्तारीत 107 एकरमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करणार आहे. त्यासाठी, आणखी 14,30,195 फूट जमीन खरेदी करायची आहे. प्रमुख मंदिराची उभारणी ही 5 एकर जागेतच होणार आहे. इतर, जमिनीवर पुस्तकालय आणि संग्रहालय यांसारखे केंद्र बनविण्यात येणार आहेत.