स्विस बँकांकडून आणखी नावे जाहीर

By Admin | Published: May 27, 2015 02:02 AM2015-05-27T02:02:48+5:302015-05-27T02:02:48+5:30

स्विस बँकेत खाती असणाऱ्या आणखी पाच भारतीयांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, भारतीय उद्योजक यश बिर्ला यांचा त्यात समावेश आहे.

More names from Swiss banks are announced | स्विस बँकांकडून आणखी नावे जाहीर

स्विस बँकांकडून आणखी नावे जाहीर

googlenewsNext

यश बिर्लांसह पाच जणांची खाती : चौकशी भारतातच होणार
बर्न : स्विस बँकेत खाती असणाऱ्या आणखी पाच भारतीयांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, भारतीय उद्योजक यश बिर्ला यांचा त्यात समावेश आहे. स्विस राजपत्रात या महिन्यात जगभरातील अशी ४० नावे प्रसिद्ध करण्यात आली असून, आणखीही काही नावे प्रसिद्ध केली जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
मुंबईतील लिमोसिन घोटाळ्यातील दोघांसह पाच भारतीयांची नावे स्वित्झर्लंडच्या अधिकृत राजपत्रात जाहीर करण्यात आली असली तरी त्यांची चौकशी भारतात होईल. स्विस बँकेच्या यादीत असणाऱ्या इतर दोघांत बांधकाम व्यवसायातील पाँटी चढ्ढा यांचे जावई गुरजितसिंग कोचर व दिल्लीतील  उद्योजिका रितिका शर्मा (ब्लेसिंग्ज अ‍ॅपरल) यांची नावे आहेत. स्वित्झर्लंडच्या सरकारी कर प्रशासनाने (एफटीए) यापैकी काही नावे आधीच भारताला कळविली होती. सोमवारी स्रेहलता साहनी व संगीता साहनी यांची नावे अशाच पद्धतीने जाहीर करण्यात आली होती. त्यांची चौकशीही भारतीय कर प्रणालीत होईल. मुंबईतील लीमोसिन घोटाळ्यातील सईद मोहम्मद मसूद हा मुंबईतून बनावट गुंतवणूक योजना चालवत असे. त्याची माहिती स्विस अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या विनंतीवरून त्याची खाती काही वर्षांपूर्वी गोठविण्यात आली आहेत. सईद मोहम्मद मसूद व कौसेर मोहम्मद मसूद याची नवी माहिती स्वित्झर्लंडच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून मागविण्यात आली होती.
यश बिर्ला यांचे नाव येताच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अनेक मेल करण्यात आले पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याचप्रमाणे रितिका शर्मा यांना करण्यात आलेल्या फोनकॉलनाही प्रतिसाद मिळाला नाही. ज्या व्यक्तींची नावे जाहीर झाली, त्यांना आपली पुढील माहिती प्रसिद्ध होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी ३० दिवसांच्या आत सरकारी प्रशासकीय न्यायालयात अपील दाखल करावे, असे एफटीएने सांगितले आहे.
बिर्ला व रितिका शर्मा यांची माहिती स्विस अधिकाऱ्यांनी आधीच दिली आहे. त्यांच्या पत्त्यासह सर्व माहिती अधिसूचनेद्वारा मिळाली आहे. पण ती स्वित्झर्लंडच्या राजपत्रात जाहीर करण्यात आलेली नाही. या राजपत्रात फक्त नावे व जन्मतारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे. इतर भारतीय नागरिकांना तसेच ब्रिटिश, स्पॅनिश व रशियन नागरिकांनाही इतकीच माहिती मिळेल. अमेरिकन व इस्रायली नागरिकांच्या नावांची आद्याक्षरे व जन्मतारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भारतासह अनेक देश आपल्या नागरिकांच्या काळ्या पैशाबद्दल स्विस बँकांकडे दीर्घकाळ करीत असलेल्या पाठपुराव्याचा हा परिणाम आहे.

Web Title: More names from Swiss banks are announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.