Corona Virus News: नववर्षाचे स्वागत कोरोना लसीने होण्याची आशा; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
By हेमंत बावकर | Published: October 13, 2020 02:20 PM2020-10-13T14:20:09+5:302020-10-13T14:28:56+5:30
Corona Virus Vaccine : डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रीगटाला याची माहिती दिली. मंत्रीगटाच्या 21 व्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, हरदीप सिंह पुरी आदी मंत्री उपस्थित होते.
नवी दिल्ली : जगासोबत करोडो भारतीयांचेही कोरोना लसीकडे डोळे लागले आहेत. मात्र, कोरोना व्हायरसवर लस आज येईल उद्या येईल या आशेवरच सारे आहेत. भारतातील काही कंपन्यांसह जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांच्या कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात सुरु आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लस कधी मिळणार हे सांगितले आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रीगटाला याची माहिती दिली. मंत्रीगटाच्या 21 व्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, हरदीप सिंह पुरी आदी मंत्री उपस्थित होते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लस भारताला मिळण्याची आशा आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, नववर्षाच्या सुरुवातीला आम्हाला एकापेक्षा अधिक कोरोना लसी मिळतील, अशी अपेक्षा आहे. आमचे तज्ज्ञ देशभरात कोरोना लस कशी पोहोचवावी याचे प्लॅनिंग करत आहेत.
याआधी रविवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी लसीचा पुरवठा करण्याची प्राथमिकता अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये त्या देशातील कोरोना संक्रमणाचा धोका, लोकांमध्ये अन्य रोगांचा प्रसार, कोरोनाचे मृत्यूदर आदी बाबी पाहिल्या जातील. आम्हाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोरोना लस कशी पोहोचेल याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
We're expecting that early next year we should have vaccine in the country from maybe more than one source. Our expert groups are formulating strategies to plan on how to roll out the distribution of the vaccine in the country: Union Health Min during Group of Ministers meeting pic.twitter.com/M2G0QzNFxG
— ANI (@ANI) October 13, 2020
देशातील कोरोनाग्रस्तांची स्थिती
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 71,75,881 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. तसेच देशातील मृत्यूदर देखील कमी झालेला आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे.
देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजच्या नव्या रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. याआधी कोरोनाचे 60 हजार रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी (13 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 71,75,881 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,09,856 वर पोहोचला आहे.