देशात कोरोनामुक्त झालेले एक कोटीहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:57+5:302021-01-08T05:14:07+5:30
अडीच लाख उपचाराधीन रुग्ण. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या १,०३,९५,२७८ असून, बरे झालेल्यांचा आकडा १,००,१६,८५९ आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या एक कोटीपेक्षा अधिक झाली असून, त्यांचे प्रमाण ९६.३६ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच लाखांपेक्षा कमी असून, मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या १,०३,९५,२७८ असून, बरे झालेल्यांचा आकडा १,००,१६,८५९ आहे. गुरुवारी कोरोनाचे २,०३,४५६ नवे रुग्ण सापडले असून, १९,५८७ जण बरे झाले होते. याच दिवशी कोरोनाने आणखी २२२ जण मरण पावले, तर बळींची एकूण संख्या १,५०,३३६ वर पोहोचली आहे. सध्या २,२८,०८३ उपचाराधीन रुग्ण असून, त्यांचे प्रमाण २.१९ टक्के आहे. नववर्षाच्या पहिल्या सात दिवसांत देशात १,२८,६०४ नवे रुग्ण आढळून आले.
महाराष्ट्र, केरळमध्ये वाढला फैलाव
महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे जनतेने बेसावध न राहता तोंडावर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग आदी नियमांचे यापुढेही काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.