मुस्लिमबहुल भागात जास्त दंगली - योगी आदित्यनाथ
By admin | Published: August 31, 2014 02:33 PM2014-08-31T14:33:15+5:302014-08-31T14:33:15+5:30
मुस्लिमबहुल भागात जास्त दंगली घडत असून ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये अन्य धर्मीयांना स्थान दिले जात नाही असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - मुस्लिमबहुल भागात जास्त दंगली घडत असून ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये अन्य धर्मीयांना स्थान दिले जात नाही असे वादग्रस्त विधान भाजपचे गोरखपूरमधील खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरील भाषणात जातीय संघर्षाला विराम लावण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. मात्र भाजप नेत्यांनी जातीय दंगलींवरुन वादग्रस्त विधान करण्याची सुरुच ठेवली आहे. गोरखपूरमधील खासदार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी जातीय दंगलीविषयी वादग्रस्त विधान केले.'ज्या भागात १० ते २० टक्के मुस्लिम समाज राहतो त्या भागात जातीय तणाव निर्माण होतो. २० ते ४० टक्के मुस्लिम समाज असलेल्या भागांमध्ये भीषण जातीय दंगली घडतात. तर त्यापेक्षा अधिक मुस्लिम समाज असलेल्या भागांमध्ये अन्य धर्मीयांना स्थानच दिले जात नाही असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. हिंदूबहूल भागात सर्वधर्मीय सुरक्षित असतात असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लालकिल्ल्यांवरील विधान आणि आदित्यनाथ यांचे विधान परस्परविरोधी असल्याचा टोला काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लगावला आहे.