थेट सहसचिवपदासाठी सहा हजारांहून जास्त अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:22 AM2018-08-20T02:22:40+5:302018-08-20T02:23:05+5:30
खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरतीने नेमल्या जायच्या सहसचिवांच्या १० पदांसाठी खासगी क्षेत्रातील सहा हजारांहून जास्त इच्छुकांनी अर्ज केले आहेत. ठराविक क्षेत्रात विशेष ज्ञान आणि प्रावीण्य असलेल्या खासगी क्षेत्रातील व्यक्तींना यापूर्वीही सरकारमध्ये नेमणुका दिल्या गेल्या असल्या तरी जाहीरपणे अर्ज मागवून एकदम १० पदे एकदम भरली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रचलित पद्धतीनुसार लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमधून निवड झालेले अधिकारी कालांतराने बढतीने सहसचिव पदावर जात असतात. अशा चढत्या भाजणीला छाट देऊन अशा थेट पद्धतीने होणाºया नेमणुकांना ‘लॅटरल एन्ट्री’ (समांतर प्रवेश) म्हटले जाते.
केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी या १० पदांसाठी भरतीची नियमावली तयार करून इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले, की अर्ज करण्याची मुदत ३० जुलै रोजी संपली; तोपर्यंत या पदांसाठी एकूण ६,०७७ अर्ज आले होते.
महसूल, वित्तीय सेवा, आर्थिक व्यवहार, कृषी आणि शेतकरी कल्याण, रस्ते वाहतूक व महामार्ग, वने आणि पर्यावरण, नवे आणि अक्षय ऊर्जास्रोत, नागरी विमान वाहतूक आणि वाणिज्य या खात्यांमध्ये हे सहसचिव नेमले जायचे आहेत. या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयनिहाय एकेका जागेसाठी आलेल्या अर्जांची संख्या निरनिराळी आहे. एकाच जागेसाठी सर्वाधिक १,१०० अर्ज आले आहेत तर एकाच जागेसाठी सर्वांत कमी आलेले अर्ज २९० आहेत. या अर्जांची छाननी करून पुढील निवड प्रक्रियेसाठी ‘शॉर्ट लिस्ट’ तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, असेही या अधिकाºयाने सांगितले.