कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 04:32 PM2021-01-15T16:32:52+5:302021-01-15T16:35:03+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून पुनावाला करत होते कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम
जगभरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर अनेक देशांनी त्यावर मात करण्यासाठी लस विकसित करण्याचं काम सुरू केलं होतं. भारतानंही कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम हाती घेतलं होतं. भारताला त्यात यशही मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना मंजुरी दिली. उद्यापासून या देशभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवातही होणार आहे. दरम्यान, गुरूवारी सीरम इन्स्टीट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र काम करत असलेले पुनावाला यादरम्यान उत्साहित वाटत होते. तसंच त्यांनी त्यांची पत्नी नताशा, त्यांची मुलं आणि अन्य कुटुंबीयांसह आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर या आनंदाच्या क्षणाचा एक फोटो शेअर करत आपल्या पतीसाठी खास संदेशही लिहिला आहे.
"या पावरहाऊसला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आणि माझे रॉक अदर पुनावाला हे या क्षणाचा आनंद घेत आहेत. हा क्षण अनेक महिन्यांच्या दिवसरात्रीच्या मेहनतीनंतर आला आहे. अजून पुढे महत्त्चाचा पल्ला गाठायचा आहे. यानंतर चांगली झोप लागेल अशी आशा करते," असा संदेश अदर पुनावाला यांच्या पत्नीनं लिहिला आहे.
अदर पुनावाला यांना अनेक दिग्गजांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरनंदेखील इन्स्टाग्राम पोस्टमधून पुनावाला यांना शुभेच्छा दिल्या. "हा मुलगा जगाला वाचवणारा आहे," असं म्हणत तिनं त्यांना शुभेच्छा दिल्या. सीरम इन्स्टीट्यूटनं विकसित केलेल्या कोविशिल्ड ही लस विकसित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या लसीकरणाच्या कामाची सुरूवात केली जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्यानं ही लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.