१३ हजारांहून अधिक मुडदे घेतायंत पेन्शन, समाजकल्याण विभागात मुरतंय पैसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 04:25 PM2023-01-10T16:25:23+5:302023-01-10T16:27:06+5:30
जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याने सांगितले की, अशा लोकांची पेन्शन पडताळणीनंतर बंद करण्यात आली आहे
हरदोई - उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात वृद्धा पेन्शनसंदर्भात केलेल्या पडताळणी कामकाजातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समाजकल्याण विभागात मोठ्या प्रमाणात गडबड होत असल्याचे या माहितीसमोर दिसून येते. जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक अशा लाभार्थ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळत असल्याचे पडताळणीत समोर आले, ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, मृत व्यक्तींच्या नावाने ही पेन्शन लाटण्याचा गोरखधंदा सुरूच होता. तर, ४५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी हे त्यांच्या पत्त्यावर राहतच नसल्याचे दिसून आले.
जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याने सांगितले की, अशा लोकांची पेन्शन पडताळणीनंतर बंद करण्यात आली आहे. आता, व्हेरीफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येईल. तसेच, सर्वच पेन्शनधारकांना आपले आधार कार्ड प्रमाणित करण्याचे सूचवले आहे. तर, मृत पेन्शनधारकांबाबत माहिती घेण्याचं काम विभागाकडून करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या समाजकल्याण विभागाने सर्वच जिल्ह्यांना वृद्धा पेन्शन संदर्भातील पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सध्या हे व्हेरीफिकेशन करण्यात येत आहे. समाजकल्याण अधिकारी राजमती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ४९५ वद्धा पेन्शनधारक आहेत. त्यामध्ये, आत्तापर्यंत ९७ हजार ३९८ जण पूर्णपणे या योजनेस पात्र आहेत. या सर्वांना आधार प्रमाणित करण्याचे बजावण्यात आले आहे. दरम्यान, यातूनची १३ हजार पेन्शनधारक मृत असल्याची माहिती समोर आली होती.