‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:17 AM2022-09-28T06:17:17+5:302022-09-28T06:17:55+5:30

आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे.

More than 150 people linked to PFI detained in second round of pan India raids Top developments | ‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

‘पीएफआय’भोवती फास आवळला; एकाच दिवसात १५० पेक्षा अधिक ताब्यात, तर काहींना अटक

Next

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे. याच पीएफआयवर पाच दिवसांपूर्वीही देशव्यापी कारवाई करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही करावाई करण्यात आली. एनआयए नेतृत्वाखाली विविध तपास संस्थांच्या पथकांनी २२ सप्टेंबर रोजी देशातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत असल्याच्या आणि कट्टरवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून पीएफआयविरुद्ध १५ राज्यांत छापेमारी केली होती. यात संघटनेचे १०६ नेते व कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यात आले होते. पीएफआयचा सहभाग असलेल्या १९ प्रकरणांचा एनआयएकडून तपास सुरू आहे. 

मंगळवारी सात राज्यांच्या पोलिसांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात मंगळवारी छापे टाकले. आसाममध्ये २५ तर महाराष्ट्रात २९ जणांची धरपकड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ५७ आणि दिल्लीत ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १० आणि कर्नाटकातही अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

पीएफआय आणि संलग्नित संघटनांनी देशातील विविध ठिकाणी केलेला हिंसाचार व या संघटनेतील सदस्यांच्या वाढत्या राष्ट्रविरोधी कृत्यांच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात स्थानिक पोलीस, विशेष कृती दल (एसटीएफ) आणि दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) यांच्या संयुक्त पथकांनी छापेमारी केली, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. 

लवकरच संघटनेवर बंदी? 

  • पीएफआयची २००६ मध्ये केरळ राज्यात स्थापना केली होती. आपण वंचित गटांच्या सशक्तीकरणासाठी नव सामाजिक चळवळ राबवत असल्याचा पीएफआयचा दावा आहे. 
  • तथापि, पीएफआय इस्लामी कट्टरवादाचा प्रसार करत असल्याचा सुरक्षा संघटनांचा दावा आहे. पीएफआयविरुद्धच्या राष्ट्रव्यापी कारवाईनंतर या संघटनेवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
     

घरांमधून कागदपत्रे जप्त
पोलीस पथकांनी २६ जिल्ह्यांत एकाच वेळी पीएफआयचे पदाधिकारी व सदस्यांची घरे व प्रतिष्ठानांवर छापे टाकून ५७ जणांना ताब्यात घेतले. छाप्यांमध्ये आढळलेली विविध कागदपत्रे व पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, आजच्या कारवाईबद्दल पीएफआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

महाराष्ट्रातून २९ जण ताब्यात

  • राज्यातून पीएफआयशी संबंधित २९ जणांची धरपकड करण्यात आली. यातील काही जणांना न्यायालयात हजर करुन नंतर सोडून देण्यात आले.  औरंगाबादमधून सर्वाधिक १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. 
  • त्यातील १० जणांवर शहर पोलिसांनी १०७ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. उर्वरित चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० दिवसांसाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. 
  • ठाण्यातून चार, पुण्यातून सहा, अहमदनगरमधून दोन, तर जळगाव, मिरज आणि नवी मुंबई येथून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Web Title: More than 150 people linked to PFI detained in second round of pan India raids Top developments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.