२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:43 PM2024-10-19T15:43:49+5:302024-10-19T15:45:55+5:30
गेल्या काही दिवसापासून देशभरातली २० हून अधिक विमानांना धमकी आली आहे. यामुळे देशभरातली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून विमानांना धमकी आली आहे. आज आणखी २० हून अधिक विमानांना धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर, विस्तारा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या विमानांना धमक्या आल्या आहेत. यातील काही विमानांना इमर्जन्सी लँडिंगही करावे लागले. ज्या फ्लाइट्सला धोका आहे त्यात इंडिगोच्या दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल, जोधपूर ते दिल्ली आणि विस्ताराच्या उदयपूर ते मुंबई या विमानांचा समावेश आहे.
दुबई-जयपूर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे शनिवारी पहाटे विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, तपासात बॉम्बची धमकी फसवी असल्याचे निष्पन्न झाले. विमानात एकूण १८९ प्रवासी होते. दुसरीकडे, दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर फ्लाइट फ्रँकफर्टकडे वळवण्यात आली. सुरक्षा तपासणीनंतर विमान लंडनला रवाना करण्यात आले आहे.
एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार,१८ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी सोशल मीडियावरून मिळाली होती. यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि खबरदारी म्हणून फ्लाइट फ्रँकफर्टकडे वळवण्यात आली.
अकासा एअरलाही शुक्रवारी बॉम्बची धमकी मिळाली होती. एअरलाइनने सांगितले की, शुक्रवारी बेंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटला (क्यूपी 1366) धमकी मिळाली. यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. विमान कंपनीने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफीही मागितली आहे.
इंडिगोच्या मुंबई ते इस्तंबूल आणि दिल्ली ते इस्तंबूल या विमानांना धमक्या आल्या होत्या. याशिवाय जोधपूरहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटलाही सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. विमान दिल्लीत उतरले. त्यानंतर ही तपासणी करण्यात आली. मुंबईहून उदयपूरला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानालाही धमकी मिळाली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली.
काही दिवसात जवळपास ४० विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, चौकशीत या सर्व धमक्या खोट्या असल्याचे समोर आले आहे. पण धमक्यांचा परिणाम फ्लाइटवर झाला आहे. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.