हिंदी महासागरात २५०० किलो ड्रग्ज जप्त; नौदलाच्या हेलिकॉप्टरची INS तरकशसह कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:47 IST2025-04-02T16:46:53+5:302025-04-02T16:47:13+5:30
भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईत २,५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

हिंदी महासागरात २५०० किलो ड्रग्ज जप्त; नौदलाच्या हेलिकॉप्टरची INS तरकशसह कारवाई
Indian Navy: भारतीय नौदलाने पश्चिम हिंदी महासागरात मोठी कारवाई केली आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस तरकशने पश्चिम हिंदी महासागरात यशस्वी ऑपरेशन करत २,५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. भारतीय नौदलाने बुधवारी या कारवाईची माहिती दिली. नौदलाच्या मिशन डिप्लॉयमेंटचा एक भाग म्हणून अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या परिसरात एक चक्रव्यूह तयार करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत कारवाईदरम्यान हे मोठं यश हाती लागलं.
वेस्टर्न नेव्हल कमांडच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय नौदलाची फ्रंटलाइन फ्रिगेट आयएनएस तरकशने २५०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने, पश्चिम हिंदी महासागरात तैनात आयएनएस तरकश, टास्क फोर्स १५० कमांडोसोबत सक्रियपणे काम करत आहे. हा संयुक्त सागरी दलाचा भाग बहरीनमध्ये आहे. गस्तीदरम्यान आयएनएस तरकशला भारतीय नौदलाच्या पी८आय हेलिकॉप्टरकडून संशयास्पद जहाजांबाबत सूचना मिळाल्या होत्या. ही जहाजे अमली पदार्थांची तस्करी करत होती.
३१ मार्च रोजी नौदलाच्या काही जहाजांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. यानंतर अमली पदार्थ जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिसरातील सर्व संशयास्पद जहाजांची पद्धतशीरपणे चौकशी केल्यानंतर, एक संशयास्पद जहाज आयएनएस तरकशने रोखले. यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात असलेल्या हेलिकॉप्टरनेही तपास सुरू केला. मरीन कमांडोसह एक बोर्डिंग टीम जहाजावर चढली आणि त्यांनी कसून शोध घेतला. जहाजावर अनेक सीलबंद पाकिटे सापडली, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.
चौकशीत २,५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जहाजावरील होल्ड आणि कंपार्टमेंटमध्ये सापडले. यामध्ये २,३८६ किलो चरस आणि १२१ किलो हेरॉईनचा समावेश आहे. संशयास्पद बोट नंतर आयएनएस तरकशच्या ताब्यात देण्यात आली आणि जहाजावरील लोकांची चौकशी करण्यात आली.
INS Tarkash, a frontline frigate of the Indian Navy operating under the Western Naval Command, has successfully intercepted and seized over 2500 kg of narcotics in the Western Indian Ocean.
— ANI (@ANI) April 2, 2025
On March 31, 2025, while on patrol, INS Tarkash received multiple inputs from Indian… pic.twitter.com/clYrBozAZM
दरम्यान, नौदलाने २०१८ मध्ये हिंदी महासागर क्षेत्राला चाच्यांच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने मिशन डिप्लॉयमेंट सुरू केले आहे. सध्या जगात भारतीय नौदलाच्या एकूण सहा युद्धनौका मिशन डिप्लॉयमेंट अंतर्गत नेहमीच उपस्थित असतात.