दररोज ३४,००० हून अधिक प्रवासी करतात 'वंदे भारत'ने वेगवान प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 09:20 AM2024-01-08T09:20:29+5:302024-01-08T09:21:00+5:30
आरामदायी प्रवासाचा अनुभव, सरासरी १२० किमी प्रतितास वेग; चेन्नईनंतर आता लातूरमध्येही हाेणार डब्यांची निर्मिती
ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वे प्रवाशांना गतिवान आणि आरामदायी सेवा देणारी सेमी हायस्पीड रेल्वेसेवा म्हणून 'वंदे भारत'कडे पाहिले जाते. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या 'वंदे भारत' रेल्वेला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील ७ मार्गांसह देशांतील एकूण २०,५०० किमीच्या ४१ मार्गांवर ही सेवा सुरू आहे.
दररोज सरासरी ३४,००० प्रवासी १२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत'चा लाभ घेत आहेत. 'वंदे भारत'ची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत केली जाते. पुढील काही वर्षांत लातूर येथेही 'वंदे भारत'ची निर्मिती केली जाणार आहे.
राज्यातील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यापैकी राज्यात मुंबई-सोलापूरला १०८ टक्के, देशात नागपूर-बिलासपूरला सर्वाधिक १२२ टक्के भारमान असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय मुंबई-शिर्डी, मुंबई-मडगाव मार्गावरील 'वंदे भारत' एक्स्प्रेसला प्रवाशांचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या जालना-मुंबई सेवेलाही प्रवाशांची पसंती मिळत आहे. बहुतांश मार्गांवरील 'वंदे भारत' एक्स्प्रेसचे भारमान ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील प्रस्तावित फेऱ्या
- मुंबई-अहमदाबाद
- मुंबई सीएसएमटी-शेगाव
- पुणे-शेगाव
- पुणे-बेळगाव
- पुणे-बडोदा
- पुणे-सिकंदराबाद
- मुंबई एलटीटी-कोल्हापूर
महाराष्ट्रातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या सेवा
मार्ग (डब्यांची संख्या) उद्घाटन अंतर
- मुंबई सेंट्रल-गांधीनगर (८) ३० सप्टेंबर २०२२ ५२२ किमी
- नागपूर बिलासपूर(८) ११ डिसेंबर २०२२ ४१२ किमी
- मुंबई-सोलापूर(१६) १० फेब्रुवारी २०२३ ४५४ किमी
- मुंबई-शिर्डी (१६) १० फेब्रुवारी २०२३ ३४१ किमी
- मुंबई-मडगाव(८) २७ जून २०२३ ५८१ किमी
- नागपूर-इंदूर(८) २७ जून २०२३ ६३६ किमी
- मुंबई-जालना (८) ३० डिसेंबर २०२३ ४३५ किमी