भारीच...देशातील अर्ध्याहून अधिक जनतेची गरीबी हटली; संयुक्त राष्ट्राने केला गाैरव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:17 AM2023-07-12T07:17:35+5:302023-07-12T07:17:49+5:30
गेल्या १५ वर्षांतील कामगिरी, जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा नुकताच नवा अहवाल मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्र आणि ऑक्स्फाेर्ड विद्यापीठाने ताे तयार केला आहे.
वाॅशिंग्टन : गरिबी निर्मूलनासंदर्भात भारताने केलेल्या कामाचा संयुक्त राष्ट्राने गाैरव केला आहे. केवळ १५ वर्षांच्या कालावधीत भारताने ४१.५ काेटी लाेकांना गरिबीतून बाहेर काढले. गरिबीमध्ये भारतात उल्लेखनीय घट दिसून आली, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा नुकताच नवा अहवाल मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्र आणि ऑक्स्फाेर्ड विद्यापीठाने ताे तयार केला आहे. केवळ गरिबीच नव्हे तर कुपाेषण आणि बालमृत्युचे प्रमाण निम्म्याहून जास्त कमी करण्यात भारताला यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतासाेबतच २५ देशांनी गरीबी यशस्वीपणे घटवून दाखविली आहे. त्यात कंबाेडिया, चीन, कांगाे, हाेंडूरास, इंडाेनेशिया, माेराेक्काे, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
गरिबी कमी करणे शक्य आहे. काेराना महामारीच्या काळात आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळे त्या काळचा आढावा घेणे कठीण आहे. मात्र, भारताने खूप चांगले काम केले आहे. - संयुक्त राष्ट्र
गरिबांना मिळाला स्वयंपाकाचा गॅस
अन्न शिजविण्यासाठी लागणाऱ्या इंधनापासून वंचित असलेल्या गरिबांचे प्रमाणही माेठ्या प्रमाणावर घटल्याचा उल्लेख अहवालात केला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही सुधारणा झाली आहे. वीज, पिण्याचे पाणी, घरे नसलेल्या गरिबांच्या प्रमाणात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.