पनामा प्रकरणात भारतातील आणखी दोन हजार नावे
By admin | Published: May 11, 2016 03:17 AM2016-05-11T03:17:02+5:302016-05-11T03:17:02+5:30
इंटरनॅशनल कंन्सोर्टियम आॅफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसने पनामा पेपर प्रकरणात आणखी विस्तृत माहिती जाहीर केली आहे
नवी दिल्ली : इंटरनॅशनल कंन्सोर्टियम आॅफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसने (आयसीआयजे) पनामा पेपर प्रकरणात आणखी विस्तृत माहिती जाहीर केली आहे. यात हजारो दस्तावेज असे आहेत, ज्यात भारताचे सुमारे दोन हजार नागरिक, कंपन्या आणि त्यांचे पत्ते यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. करचोरीचे सुरक्षित ठिकाण म्हणून पनामा पेपर उघड झाल्यानंतर यापूर्वी भारतातील काही नावे समोर आलेली आहेत.
आयसीआयजेने जाहीर केलेल्या या माहितीत नेवादापासून हाँगकाँगपर्यंत व ब्रिटिश आइसलँडसह अन्य भागातील सुमारे २ लाख १४ हजार नावे वा कंपन्यांची नावे आहेत. ही माहिती पनामा पेपर प्रकरणाच्या चौकशीचाच एक भाग आहे. विदेशी कंपन्या आणि त्यातील नागरिक यांची जाहीर झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी माहिती आहे. यात कंपन्यांच्या मूळ मालकाचीही नावे आहेत. पनामाची कायदेविषयक संस्था मोसैक फोन्सेका यांनी म्हटले आहे की, एखाद्या देशातील माहितीचा दुसरा पैलूही असू शकतो. विदेशी कंपन्या आणि ट्रस्ट यांचा कायदेशीर वापरही होतो याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. संस्थेने आपल्या वेब पोर्टलवर म्हटले आहे की, आयसीआयजेच्या विदेशातील माहितीत ज्या नागरिकांची, कंपन्यांची नावे आली आहेत त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे म्हणता येणार नाही. मागील महिन्यात पनामा प्रकरणातील नावे समोर आल्यानंतर ५००पेक्षा अधिक नावांवर तपास करण्यासाठी भारताने एका संस्थेची (एमएजी) स्थापना केली आहे.
> काय आहे भारतातील माहिती?
भारताशी संबंधित २२ कंपन्या वा अन्य संस्था, अधिकारी किंवा नागरिकांशी संबंधित १०४६ लिंक, ४२ प्रतिनिधी वा दलाल यासह देशातील ८२८ पत्ते (अॅड्रेस) यांचा या माहितीत समावेश आहे. यात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईच्या उपनगरांसह हरियाणाच्या सिरसा, बिहारच्या मुजफ्फरपूर आणि मध्य प्रदेशच्या मंदसौर, भोपाळ येथील पत्त्यांचा समावेश आहे.