प्रवासादरम्यान खासदाराला डास चावला तर थांबवली ट्रेन, डब्याची लगेच साफसफाई झाली आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 03:22 PM2023-04-25T15:22:19+5:302023-04-25T15:24:12+5:30
खासदाराने तक्रार नोंदवली आणि संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली.
उत्तर प्रदेशमध्ये एका खासदाराला डास चावल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ सुरू आहे. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (१२४१९) ट्रेनमध्ये प्रवास करत होते. याप्रवासादरम्यान त्यांना डास चावला. मग काय... खासदाराने तक्रार नोंदवली आणि संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली.
घाईगडबडीत रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवल्यानंतर संपूर्ण डब्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डब्याची साफसफाई झाल्यानंतरच गाडी तिथून पुढे रवाना करण्यात आली. दरम्यान, खासदार राजवीर सिंग यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवर ट्रेनमध्ये डास चावल्याची तक्रार केली होती. खासदार राजवीर सिंह ट्रेनच्या पहिल्या एसी डब्यात प्रवास करत होते.
ट्रेनचे बाथरूम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे. या ट्विटनंतर अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आणि ट्रेन उन्नाव येथे थांबवण्यात आली. यानंतर संपूर्ण डबा स्वच्छ करण्यात आला. डास दूर करण्यासाठी संपूर्ण डब्यावर फवारणी करण्यात आली. यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात आली. रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागत असले. सामान्यांचे अधिकाऱ्यांकडून ऐकले जात नसल्याचे लोक सांगतात. सामान्य माणूस तक्रार करत राहतो. पण एखाद्या नेत्याची अडचण झाली की, प्रशासन तत्काळ कारवाईत येते. दरम्यान, रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की, त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे सुद्धा कोणी नाही. कधी पाणीटंचाई, कधी घाण तर कधी उन्हाळ्यात पंखे खराब झाल्याच्या तक्रारी, अशा समस्यांनी प्रवासी नेहमीच त्रस्त असतात.