सर्वात देखण्या पुलाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
By admin | Published: March 8, 2017 12:43 AM2017-03-08T00:43:41+5:302017-03-08T00:43:41+5:30
भडोच केवळ गुजरातचाच नव्हे तर देशाचाही दागिना आहे. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या या शहराने गुजरातची संस्कृती समृद्ध केली. या ऐतिहासिक शहरात देशातील सर्वात लांब अंतराचा
- सुरेश भटेवरा, भरूच (गुजराथ)
भडोच केवळ गुजरातचाच नव्हे तर देशाचाही दागिना आहे. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या या शहराने गुजरातची संस्कृती समृद्ध केली. या ऐतिहासिक शहरात देशातील सर्वात लांब अंतराचा केबल ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. याखेरीज पेट्रोलियम पदार्थांपासून विविध उत्पादने तयार करणारा ओएनजीसी पेट्रो अॅडिशन्स लि.(ओपल) चा मोठा उद्योग, लवकरच नजिकच्या दहेज औद्योगिक क्षेत्रात उभा राहतो आहे. त्यात आठ लाख तरुणांना रोजगार पुरवण्याची क्षमता आहे. भडोचचेच नव्हे तर गुजरातचे भाग्य उजळून टाकणारी ही घटना आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी मनोहारी केबल पुलाचे उद्घाटन, ओपलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शिलान्यास आणि खाजगी तसेच सार्वजनिक भागीदारीतून विमानतळासारख्या आधुनिक सुविधा पुरवणाऱ्या भडोचच्या बस पोर्टचे भूमीपूजन झाले.
त्यानंतरच्या सभेत पंतप्रधानांनी दोन वर्षांत देखणा पूल तयार केल्याबद्दल केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व त्यांच्या टीमची मुक्त कंठाने प्रशंसा केली. आगामी काळात गुजरातमधे विविध क्षेत्रांत विकास योजनांचे कोणते पट उलगडले जाणार आहेत, त्याचा आराखडा पंतप्रधानांनी ४0 मिनिटांच्या भाषणात सादर केला. नर्मदेचे मनाला आनंद देणारे व सतत भरलेले पात्र, त्यात सुरू होणारी जलवाहतूक, राज्यात सिंगापूरपेक्षाही आकर्षक अशी पर्यटनाची नवनवी स्थळे तयार करण्यासाठी १३00 लहान मोठ्या बेटांचा विकास, प्रत्येक गावाला पिण्याचे शुध्द पाणी, अपघातविरहित रुंद व प्रशस्त रस्ते, देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत आॅप्टीकल फायबर नेटवर्क आदी योजनांचा उल्लेख भाषणात केला.
नितीन गडकरींनी या पुलाचा प्रकल्प दोन वर्षांत कसा मार्गी लागला, याची कहाणी सांगताना आपल्या मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख केला.
गुजरातच्या योजनांचा आढावा
गुजरातमधील प्रमुख राज्यमार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची घोषणाही या प्रसंगी झाली. मुख्यमंत्री विजय रूपानींनी गुजरातच्या विकासाचे अग्रक्रम सांगीतले, तर उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी राज्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे स्वागत भडोचचे खासदार मनसुखभाई वसावा यांनी केले. या वर्षाअखेर गुजरात विधानसभेच्या निवडणुका आहेत. भडोचच्या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदींनी एकप्रकारे निवडणूक प्रचाराचा आठ महिने आधीच शुभारंभ केला.