महाराष्ट्रामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांचे मृत्यू सर्वाधिक

By admin | Published: March 22, 2017 12:49 AM2017-03-22T00:49:09+5:302017-03-22T00:49:20+5:30

कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले.

Most of the deaths of prisoners of police custody in Maharashtra | महाराष्ट्रामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांचे मृत्यू सर्वाधिक

महाराष्ट्रामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांचे मृत्यू सर्वाधिक

Next

नवी दिल्ली : कोठडीतील कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मान्य केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना वरील कबुली दिली.
महाराष्ट्रात कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण (पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू) काहीसे जास्त आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३५ जणांचा कोठडीत मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये २१, तर २०१५ मध्ये १९ जण कोठडीत दगावले होते. हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. कोठडीतील मृत्यूंना जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत, असे रिजिजू म्हणाले.
मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त आणि भाजपा सदस्य सत्यपाल सिंह यांनी रिजिजू यांची आकडेवारी खोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस देशात सर्वश्रेष्ठ पोलीस दल आहे, असे ते म्हणाले, तेव्हा काही सदस्यांना हसू फुटले.
त्यावर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ‘आम्हाला तुमचीही (सत्यपालसिंह) आकडेवारी पाहावी लागेल,’ असे गमतीने म्हटले. तेव्हा सभागृहात पुन्हा हास्याची लकेर पसरली.
मृत्यूची कारणे इतरही?-
पोलिसांच्या ताब्यात झालेल्या कैद्यांच्या सर्व मृत्यूंना कोठडीतील मृत्यू म्हटले जात नाही. कारण यातील काही मृत्यू न्यायालयीन कोठडीत किंवा नैसर्गिक कारण अथवा आजारपणामुळे झालेले असतात, असे सत्यपाल सिंह यांचे म्हणणे होते.
माजी केंद्रीय गृहसचिव व खा. आर. के. सिंह आणि झारखंड पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक व खा. व्ही. डी. राम हे मात्र, सत्यपालसिंह यांच्या मताशी सहमत नव्हते. ते काही बोलू इच्छित होते. मात्र, अध्यक्षांनी त्यांना मुभा दिली नाही. दोन्ही भाजपाचे सदस्य आहेत.

Web Title: Most of the deaths of prisoners of police custody in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.