भारताला विदेशातून मिळाला सर्वाधिक पैसा
By admin | Published: April 15, 2015 01:48 AM2015-04-15T01:48:21+5:302015-04-15T01:48:21+5:30
२०१४ मध्ये भारताला विदेशात राहणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक भारतीयांनी आपल्या मायदेशाला ७० अब्ज डॉलर पाठविले आहेत.
वॉशिंग्टन : विदेशात राहणाऱ्या नागरिकांकडून मिळणाऱ्या पैशांबाबत भारताचे स्थान अगदी वरचे असून २०१४ मध्ये भारताला विदेशात राहणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक भारतीयांनी आपल्या मायदेशाला ७० अब्ज डॉलर पाठविले आहेत. जागतिक बँकेच्या द्विवार्षिक ‘दक्षिण आशिया आर्थिक झोत’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, एवढा मोठा पैसा पाठविण्यामागचे कारण हे युरोपातील कमकुवत आर्थिक वाढ, रशियाच्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण आणि रशियाचा रूबल व युरोचे झालेले अवमूल्यन होय. २०१५ मध्ये विकसनशील राष्ट्रांना अशा पद्धतीने ४४० अब्ज अमेरिकन डॉलर पाठविले जातील अशी अपेक्षा आहे.
ही रक्कम २०१४ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी जास्त असेल. जास्त उत्पन्न असलेल्या देशांसह जागतिक पातळीवर अशा प्रकारे पाठविला जाणारा पैसा ०.४ टक्क्यांनी वाढून ५८६ अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे.
अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये जाऊन लोकांची काम करायला पसंती असते. याबरोबरच भारताशिवाय चीन, फिलिपीन, मेक्सिको आणि नायजेरिया या देशांत विदेशांतून येणारा पैसा हा सर्वांत जास्त आहे. जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ व वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू म्हणाले की, ‘‘२०१४ मध्ये एकूण पाठविण्यात आलेला पैसा ५८३ अब्ज डॉलरवर गेला आहे. भारताला ७०, चीन ६४, फिलिपीन २८ अब्ज डॉलर मिळाले. नव्या विचारांनुसार या पैशांचा वापर पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासासाठी केला जाऊ शकतो.’’ (वृत्तसंस्था)