नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:08 AM2018-05-01T06:08:47+5:302018-05-01T06:08:47+5:30
गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत. अशा शहरांची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. नदीकिनारी असलेल्या प्रदूषित विभागांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रातच आहे. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम दीड ते दोन वर्षांत दिसतील असे सरकारचे म्हणणे आहे.
पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात प्रदूषित नद्यांच्या तीरावर वसलेल्या शहरांची संख्या ६५० असून, त्यातील १६१ शहरे महाराष्ट्रात आहेत. एकूण २७५ नद्यांच्या सर्वाधिक प्रदूषित ३०२ विभागांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातील ४९ विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये बाणगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिका, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, रंगावली, इंद्रायणी, मिठी, वशिष्ठी, अंबा, अमरावती, बिंदुसरा, धारणा, हिवरा, मोर, मोरणा, मुळा, मुठा, पवना, पूर्णा यांचा समावेश आहे.
कृती आराखडा
नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय एक आराखडा तयार करत आहे. नागपूर, नाशिक व नांदेडमध्ये त्यादृष्टीने कामास सुरुवात झाली आहे. सांडपाणी नदीत सोडले जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत.
नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्रात २५० ठिकाणी निरीक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
या केंद्रांकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुळा-मुठा, गोदावरी, तापी, नीरा, भातसा या नद्यांमधील प्रदूषणाची पातळी जरा कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता वाढली आहे.
मुंबई सर्वाधिक प्रदूषित
नदीकिनारच्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये मुंबई, पुणे, नांदेड, अकोला, नागपूर, सांगली, अमरावती, कल्याण, पनवेल यांचा समावेश आहे. राज्यातील ज्या ४९ ठिकाणी नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत त्यातील २४ ठिकाणी नद्यांचा प्रवाह अतिशय धीमा आहे. त्यामुळे प्रदूषणाला दूर करण्याची नदीची क्षमताच संपल्यात जमा आहे. उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडण्यात येते. कचराही टाकण्यात येतो. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.