Passport: या देशाचा पासपोर्ट आहे जगात सर्वात शक्तिशाली, भारताचा क्रमांक कितवा? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:59 PM2024-02-19T12:59:03+5:302024-02-19T12:59:41+5:30
Most Powerful Passport In The World: आपल्या देशाबाहेर कुठे जायचं असल्यास आपल्याकडे आपल्या देशाचा पासपोर्ट आणि जिथं जायचं आहे, अशा देशाचा व्हिसा असणं आवश्यक असतं. दरम्यान, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी दर्शवणारा हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ प्रसिद्ध झाला आहे.
आपल्या देशाबाहेर कुठे जायचं असल्यास आपल्याकडे आपल्या देशाचा पासपोर्ट आणि जिथं जायचं आहे, अशा देशाचा व्हिसा असणं आवश्यक असतं. दरम्यान, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी दर्शवणारा हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये फ्रान्सने पहिलं स्थान पटकावलं आहे. फ्रान्सचे पासपोर्टधारक तब्बल १०४ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. मात्र हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचं स्थान मागच्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरलं असून, या क्रमवारीत आता भारत ८५ व्या क्रमांकावर आहे.
कुठल्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे याची गणना त्या देशाच्या पासपोर्टवर किती देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश दिला जातो यावरून केली जाते. म्हणजेच ज्या देशाच्या पासपोर्टचा वापर करून तुम्ही किती देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकता, त्यावरून तो पासपोर्ट किती शक्तिशाली आहे, हे ठरवलं जातं.
हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये फ्रान्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर फ्रान्ससोबत जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन हे क्रमवारीत वरच्या स्थानावर आहेत. तर भारताच्या पासपोर्टचं स्थान मागच्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरलं आहे. भारताची क्रमवारीत झालेली घसरण थोडी धक्कादायक मानली जात आहे. कारण गतवर्षी भारताच्या पासपोर्टच्या जोरावर ६० देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येत असे. मात्र यावर्षी व्हीसा फ्री देशांची संख्या वाढून ६२ एवढी झाली आहे.
भारताचा शेजारील देश असलेला पाकिस्तान या यादीमध्ये १०६ व्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश एका क्रमाने घसरून १०२ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा सागरी शेजारील देश असलेल्या मालदीवचं स्थान या यादीमध्ये भक्कम आहे. मालदीव शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांमध्ये ५८ व्या क्रमांकावर आहे. मालदीवच्या पासपोर्टचा वापर करून ९६ देशांमध्ये प्रवास करता येऊ शकतो.