परदेशी शिक्षणासाठी पंजाब, महाराष्ट्राचे सर्वाधिक विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 10:49 AM2023-10-28T10:49:35+5:302023-10-28T10:50:09+5:30
जर्मनी, किर्गीस्तान, आयर्लंड, रशिया आणि फ्रान्सला जाण्याकडे अधिक कल
नवी दिल्ली : पंजाब, तेलंगणा व महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जातात. हे विद्यार्थी जर्मनी, किर्गीस्तान, आयरलँड, रशिया व फ्रान्समध्ये शिक्षण घेणे जास्त पसंत करतात, अशी माहिती एका अहवालात पुढे आली आहे.
बियॉन्ड बेड्स अँड बाऊंड्रिज : इंडियन स्टुडंट मोबिलिटी रिपोर्ट-२०२३ जारी करण्यात आला असून, यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व आस्ट्रेलियावर विशेष लक्ष देण्याबरोबरच विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या गतिशीलतेवरही प्रकाश टाकला आहे.
या अहवालानुसार, २०१९मध्ये सुमारे १०.९ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले. २०२२मध्ये ही संख्या १३.२४ लाख झाली. विदेशी शिक्षण घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सध्या १५ टक्क्यांची वाढ कायम आहे. २०२५मध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या २० लाखांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
पारंपरिक रूपाने भारतीय विद्यार्थी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व ऑस्ट्रेलियासारख्या देशांना प्राधान्य देताना दिसतात. परंतु अलीकडच्या काळात जर्मनी, किर्गीस्तान, आयर्लंड, सिंगापूर, रशिया, फिलीपाइन्स, फ्रान्स व न्यूझीलंड भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
इतर राज्यांचे प्रमाणही लक्षणीय
विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राज्यवार संख्येत पंजाब, तेलंगणा व महाराष्ट्र आघाडीवर आहेत. विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत पंजाबचे १२.५ टक्के, आंध्र / तेलंगणाचे १२.५ टक्के, महाराष्ट्राचे १२.५ टक्के, गुजरातचे ८ टक्के, दिल्ली / एनसीआरचे ८ टक्के, तामिळनाडूचे ८ टक्के, कर्नाटकचे ६ टक्के व इतर राज्यांचे ३३ टक्के विद्यार्थी आहेत. (वृत्तसंस्था)
विदेशातील शिक्षणाचा खर्च वेगाने वाढणार
-अहवालात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदेशात जाऊन शिक्षण घेण्यावर होणाऱ्या खर्चात वेगाने वाढ होणार आहे.
-२०२५मध्ये सुमारे ७० अब्ज अमेरिकी डॉलर यावर खर्च होण्याची शक्यता आहे.
-२०२९मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशी शिक्षणावर ३७ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च केले.
-२०२२मध्ये यात ९ टक्के वाढ झाली व हा खर्च ४७ अब्ज डॉलरपर्यंत गेला.
-दरवर्षी या खर्चात १४ टक्के वाढीची शक्यता आहे.