"आतापर्यंतचं सर्वात अवैज्ञानिक सरकार..."; कोरोना परिस्थितीवरून ओवैसी यांचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 12:44 PM2021-05-09T12:44:08+5:302021-05-09T12:47:05+5:30
Coronavirus Pandamic : कोरोनामुळे उद्धभवलेल्या ऑक्सिजनच्या परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयानं केली होती टास्क फोर्सची स्थापना
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. दरम्यान, सध्या देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार आतापर्यंतचं अवैज्ञानिक सरकार असल्याचं म्हणत ओवेसी यांनी सरकारवर टीका केली. पहिल्या लाटेनंतर सरकारनं स्वत:च्या विजयाची घोषणा केली आणि स्वत:च स्वत:ला शाबासकीही दिल्याचं ते म्हणाले. "त्यांचे स्वत: सल्लागारच तिसऱ्या लाटेबद्दल गोंधळलेल्या स्थितीत आहेत. सरकारच्या आदेशावर वैद्यानिक आपली स्थिती बदलत आहेत का?," असा सवालही त्यांनी यावेळी केला. ओवेसी यांची ही प्रतिक्रिया केंद्र सरकारचे मुख्य सल्लागार विजय राघवन यांच्या त्या वक्तव्यानंतर आली ज्यात त्यांनी तिसऱ्या लाटेबद्दल शक्यता व्यक्त केली होती.
ओवेसी यांनी ट्विटरद्वारे सर्वोच्च न्यायालयाद्वारे नेमलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या स्थापनेवरूही निशाणा साधला. "जर सरकार दुसऱ्या लाटेसाठी तयार असतं आणि त्यांचा वागणूक निष्काळजीपणाची नसती तर याची गरज पडली नसती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरून सरकार घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य कसे खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसून येते. कार्यकारी क्षेत्रात न्यायालयाचा हा एक प्रकारचा हस्तक्षेप आहे," असंही ओवेसी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी एका नॅशनल टास्क फोर्सची स्थापना केली. देशातील ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठ्याची माहिती, तसंच यासंदर्भातील शिफारसी करण्याचं काम हे टास्क फोर्स करणार आहे. टास्क फोर्समध्ये १२ सदस्य असतील. टास्क फोर्स आता आणि भविष्यातील पारदर्शक पद्धतीनं महासाथ आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत आणि रणनिती सादर करणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं.