छेडछाड करणाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी आई-मुलीने मारली धावत्या ट्रेनमधून उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 01:34 PM2017-11-13T13:34:39+5:302017-11-13T13:35:48+5:30
कानपूरमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आई-मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना घडली आहे.
कानपूर- कानपूरमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आई-मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. या मायलेकी रेल्वे रुळांजवळ तब्बल दोन तास बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या.
आई आणि मुलगी हावडा-जोधपूर एक्स्प्रेसमधून कोलकाताहून दिल्लीला येत होत्या. एक्स्प्रेसने हावडा स्थानक सोडल्यानंतर १५ तरुणांनी त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली. पीडितेच्या आईने याबाबत रेल्वे पोलीस शिपायाला माहिती दिली. त्यानंतर शिपाई डब्यात आला आणि छेड काढणाऱ्या दोन ते तीन तरुणांना घेऊन गेला. काही वेळाने ते तरुण पुन्हा डब्यात घुसले. त्यांनी दोघींचीही छेड काढण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलीला खेचण्याचा प्रयत्न केला. यामुळे भेदरलेल्या मायलेकींनी अब्रु वाचवण्यासाठी धावत्या एक्स्प्रेसमधून उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दोन तास त्या रेल्वे रुळांजवळ बेशुद्धावस्थेत पडून होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मायलेकीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याचं पाहिल्यानंतर गार्डने या घटनेची माहिती जीआरपीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जीआरपीने घडनास्थळी पोहचत त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान, या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जातो आहे. पोलिसांनी जर वेळेवर छेडछाड करणाऱ्या तरूणांच्या विरोधात कारवाई केली असती तर ही घटना घडली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.