हृदयद्रावक! आईचा अपघातात मृत्यू; अंत्यविधीला जाणाऱ्या लेकानेही अपघातात गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:44 PM2023-08-12T12:44:43+5:302023-08-12T12:49:47+5:30
आईच्या मृत्यूनंतर 12 तासांतच मुलाचाही अपघातात मृत्यू झाला. आईचा बाईक अपघातात, तर मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर 12 तासांतच मुलाचाही अपघातात मृत्यू झाला. आईचा बाईक अपघातात, तर मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 55 वर्षीय राणी देवी आणि त्यांचा मुलगा सूरज सिंह अशी मृतांची नावे आहेत. दोघांवर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी जटारी येथे एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. राणी देवीच्या पतीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले जाते. राणी देवींनी तीन मुलं आणि तीन मुलींचे संगोपन केलं. राणी देवी मोठा मुलगा प्रकाश आणि धाकटा मुलगा सनीसोबत गावात राहत होत्या. तर मधला मुलगा सूरज इंदूरला राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राणी देवी मुलगा सनीसोबत बाईकने आपल्या माहेरच्या घरी जात होत्या. तेव्हा त्यांच्या गावापासून 12 किमी अंतरावर असलेल्या डभौरा येथे समोरून येणाऱ्या बाईकने त्यांना धडक दिली. जात्री गावच्या सरपंच संतरा देवी यांनी सांगितले की, सनी आणि त्याची आई राणी देवी यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना रेवा येथे रेफर केले. रुग्णालयात नेत असताना राणी देवी यांचा मृत्यू झाला. सनीला फ्रॅक्चर झाले आहे.
मुलगा सूरज याला आईच्या मृत्यूची बातमी समजताच तो इंदूरहून मूळ गावी जाण्यासाठी निघाला. तो त्याचा मित्र अभिषेक सिंहशी बोलला. अभिषेकने त्याच्या गाडीतून जायचं ठरवलं. दोघांनाही गाडी चालवायला येत नसल्याने ते ड्रायव्हरसह निघाले. सूरज नुकताच सतना जिल्ह्यातील रामपूर बघेलान येथे पोहोचला होता, त्याच्या गावापासून सुमारे 100 किमी दूर, तेव्हा त्याच्या कारला अपघात झाला.
या प्रकरणाची माहिती देताना रामपूर बघेलन पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप चतुर्वेदी म्हणाले, आम्हाला सकाळी ७ वाजता कार अपघाताची माहिती मिळाली. गाडीचा टायर फुटल्याचे दिसते. यामुळे कारचे नियंत्रण सुटले आणि उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. तिघांनाही रीवा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सूरजचा मृत्यू झाला तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. ते म्हणाले की, संपूर्ण गाव दु:खी आहे. दोन लोकांचा मृत्यू कोणीही सहन करू शकत नाही. आई आणि मुलाचे एकत्र अंत्यसंस्कार करताना पाहून मन हेलावून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.