अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:52 PM2024-06-03T12:52:56+5:302024-06-03T12:59:05+5:30
Mother Dairy Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर मदर डेअरीनेही आता ३ जूनपासून सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात वाढ केली आहे.
अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर मदर डेअरीनेही आता ३ जूनपासून सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ आजपासून लागू झाल्याचं मदर डेअरीने म्हटलं आहे.
मदर डेअरीने सोमवारी दुधाच्या सुधारित दराची यादी जाहीर केली. यादीनुसार आता लोकांना मदर डेअरीचं बल्क वेंडेड दूध ५२ ऐवजी ५४ रुपये, टोन्ड दूध ५४ ऐवजी ५६ रुपये, गायीचे दूध ५६ ऐवजी ५८ रुपये, फुल क्रीम दुधासाठी ६६ ऐवजी ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हशीच्या दुधाला ७० ऐवजी ७२ रुपये आणि डबल टोन्ड दुधासाठी ४८ ऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
मदर डेयरी ने 3 जून से ताजे थैली वाले दूध (सभी प्रकार) की कीमतों में 2 रुपये प्रति लीटर की बढ़ोतरी की है: मदर डेयरी pic.twitter.com/q4GqPhuAMq
— ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2024
दुधाचे भाव का वाढले?
दुधाचे दर वाढण्याचं कारण म्हणजे त्यासाठी येणारा खर्च जास्त असल्याचं दुग्ध व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. कडाक्याच्या उन्हात दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. गाई-म्हशींनी दूध देणे बंद केलं किंवा कमी केलं आहे. या कारणांमुळे कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले आहेत.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सोमवारपासून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. युनियनने म्हटले आहे की, "एकूण कामकाजाचा खर्च आणि दुधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. आमच्या सदस्य संघटनांनीही गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या किमतीत सुमारे ६-८ टक्क्यांनी वाढ केली आहे."
अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
देशातील सर्वात मोठा दूध उत्पादन संघ अमूलने प्रति लीटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) उद्यापासून म्हणजेच ३ जूनपासून ही दरवाढ लागू केली असून याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. या दरवाढीमध्ये अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल शक्ती आदी उत्पादने आहेत. अमूल ताज नाना पाउच सोडून सर्व दुधाचे दर वाढविण्यात आले आहेत.
नव्या दरवाढीनुसार अमूल गोल्डच्या अर्धा लीटर दुधाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपये झाली आहे. अमूल ताजाची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपये झाली आहे. अमूल शक्तीची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली आहे. हे दर अहमदाबादमधील आहेत. महाराष्ट्रासह देशभरात या दरात बदल होऊ शकतात. अमूलने दरवाढ केल्यानंतर आता मदर डेअरी सारख्या कंपन्याही त्यांच्या दूध दरात वाढ करण्याची शक्यता आहे.