कोरोनात माय-बाप गमावले, LICवाले घर जप्तीसाठी मागे लागलेले; पुनावालांनी कर्जाचे 27 लाख रुपये 'फेडले'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 04:47 PM2022-12-07T16:47:21+5:302022-12-07T16:47:59+5:30
वनिशाच्या आईवडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. यामुळे ती अनाथ झाली होती. ते दु:ख पचवत असतानाच एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या नोटीसावर नोटीसा धडकू लागल्या...
कोरोना काळात अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहेत. काहींनी तर आई-वडील दोन्ही गमावले आहेत. अशा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी सरकारे मदत करत आहेत. असे असताना १० वीच्या बोर्ड परीक्षेत ९९.८ टक्के मिळविणाऱ्या कोरोनात अनाथ झालेल्या वनिशासमोर मोठे संकट उभे ठाकले होते. कोरोना काळात भारतातच नाही तर जगभरात कोरोना लसीची मदत पोहोचविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटच्या अदार पुनावाला हे वनिशाच्या मदतीला धावले आहेत.
वनिशाच्या आईवडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. यामुळे ती अनाथ झाली होती. वनिशाच्या वडिलांनी एलआयसी बँकेकडून कर्ज काढून घर घेतले होते. परंतू, कमावता व्यक्तीच गेल्याने घराचे हप्ते थकले होते. नववी, दहावीत शिकणारी वनिशा असे किती पैसे फेडणार होती. तिला आई वडील गेल्याचे दु:ख पचविताना अभ्यासही करायचा होता आणि त्यात बँकेच्या घरावर जप्तीच्या नोटिसाही धडकत होत्या.
वनिशाने बँकेला पत्र पाठवून काही दिवसांची मुभा मागितली होती. याबाबतचे वृत्त पसरताच अनेक लोक तिच्या समर्थनात आले होते. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या परीने मदतही केली होती. ही बँक दुसरी तिसरी कोणती नव्हती तर एलआयसी होती. एक पेच असा होता की तिच्या वडिलांनी कर्ज घेताना वारस दाखविला नव्हता. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला होता. अदार पुनावाला देखील वनिशाच्या मदतीला धावले होते. या प्रकरणाची माहिती अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. सीतारामन यांनी देखील एलआयसीला सुनावत यात लक्ष घालण्यास सांगितले होते.
जेव्हा बँकांच्या नोटीसा येत होत्या तेव्हा वनिशाला १८ वर्षे देखील पूर्ण झाली नव्हती. नोव्हेंबरमध्ये तिला १८ वर्षे पूर्ण झाली. याबरोबर पुनावाला यांनी दिलेला शब्द पाळला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, सीईओ विल्लू पूनावाला फाउंडेशन आणि अदार पूनावाला यांनी तिला गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी रु. 27.47 लाख मदत देऊ केली आहे.