'मेजर गोगोई बऱ्याचदा अचानक रात्री घरी यायचे', तरुणीच्या आईचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:15 AM2018-05-25T11:15:39+5:302018-05-25T11:15:39+5:30
मुलगी सकाळी बँकेत जाते सांगून घरातून निघाली होती.
श्रीनगर- गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेवेळी एका स्थानिक तरूणाला जीपला बांधणारे मेजर लीतुल गोगोई वादाच्या भोवऱ्यात सापडले. एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने गोगोई यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याने त्यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं.
मेजर गोगोई यांच्याबद्दलचं हे प्रकरण आता नवं वळण घेणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. गोगोईंबरोबर हॉटेलमध्ये गेलेल्या मुलीच्या आईने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'गोगोई अनेक वेळा रात्री आमच्या घरी आले होते. गोगोई यांच्याबरोबर हॉटेलमध्ये असलेला समीर अहमदही त्यांच्याबरोबर घरी यायचा', असा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे.
'माझी मुलगी सकाळी बँकेत जाते सांगून घरातून निघाली होती. पण ती घरी लवकर परतली नाही. पोलिसांनी जेव्हा गावाच्या सरपंचाना फोन केला तेव्हा ती कुठे आहे हे समजलं. गोगोई रात्रीच्या वेळी घरी यायचे. त्यांना बघून मला ठीक नाही वाटायचं. त्यांच्याबरोबर येणारा समीर माझ्या मुलीशी बोलायचा. मला संशय यायचा पण त्यांच्याबरोबर माझी मुलगी हॉटेलमध्ये मिळेल, असं कधीही वाटलं नसल्याचं मुलीच्या आईने म्हटलं.
नेमकं प्रकरण काय?
मेजर लीतुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. कर्मचाऱ्यांनी तरूणीचं ओळख पत्र तपासलं असता ती बडगामची रहिवासी असल्याचं समोर आलं. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितलं. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे गेल्याने गोगोई यांची चौकशी करण्यात आली.