आई, मैत्रीण अन् मार्गदर्शक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:18 AM2017-11-19T04:18:29+5:302017-11-19T07:13:12+5:30
इंदिरा गांधी... नीतिमूल्यांसाठी केवळ त्या ठामपणे उभ्याच ठाकल्या नाहीत, तर आयुष्यभर त्यांनी त्याचं संवर्धन, पाठपुरावा केला. त्यासाठी आपलं सर्वस्व वेचलं आणि त्याचसाठी आपला देहही ठेवला. इतक्या अत्यल्प काळात मला इंदिरा गांधी यांची थोरवी वर्णन करता येणार नाही, त्यासाठी काही पुनर्जन्म घ्यावे लागतील.
- सोनिया गांधी
(काँग्रेस अध्यक्ष)
इंदिरा गांधी... नीतिमूल्यांसाठी केवळ त्या ठामपणे उभ्याच ठाकल्या नाहीत, तर आयुष्यभर त्यांनी त्याचं संवर्धन, पाठपुरावा केला. त्यासाठी आपलं सर्वस्व वेचलं आणि त्याचसाठी आपला देहही ठेवला. इतक्या अत्यल्प काळात मला इंदिरा गांधी यांची थोरवी वर्णन करता येणार नाही, त्यासाठी काही पुनर्जन्म घ्यावे लागतील.
पंतप्रधान, प्रखर राजकारणी, विचारवंत, कठोर निर्णय घेणा-या नेत्या अशा अनेक कारणांसाठी इंदिरा गांधी आपल्याला परिचित आहेत. त्यांचं अतुलनीय धैर्य, वज्राहून कठोर अशी त्यांची दृढता, कर्तव्याप्रति असलेली त्यांची वादातित निष्ठा याबद्दलही अनेकांनी त्यांना मानाचा मुजरा केला आहे..
एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्या आपल्याला माहीत असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांचं ते रूप अपरिचित होतं. एकाच छताखाली राहत असताना त्यांची अनेक रूपं मी अनुभवली. आईच्या मायेनं सुनेचं संगोपन करणाºया त्या सासू होत्या, आई होत्या आणि मुलांच्या आजीही!
अनेक रूपांत त्या मला भेटल्या. आईची प्रेमळ माया तर मला त्यांच्याकडून कायम मिळालीच, पण कायम पाठीशी उभ्या राहणाºया त्या माझ्या सच्ची मैत्रीण होत्या. त्याचवेळी कुठल्याही अडचणीच्या क्षणी धावून येणा-या मार्गदर्शक, मदतनीसही. अतिशय नर्व्हस आणि लाजरीबुजरी अशी मी. विवाहानंतर जेव्हा त्यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा खूप ममतेनं त्यांनी माझं स्वागत केलं!
माझ्या आयुष्यातील सोळा वर्षं मला इंदिराजींसोबत घालवता आली, त्यांच्यासोबत राहता आलं, हे माझं भाग्य. प्रत्येक पावलावर मला त्यांची सोबत होती, मार्गदर्शन होतं. अनेक वेळा मी अडखळले, गोंधळले, पण माझी प्रत्येक अडचण त्यांनी मनापासून समजून घेतली. परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं हे तर त्यांनी शिकवलंच, पण आपला देश, आपली संस्कृती, आपली नीतिमूल्यं, आणि अर्थातच आपलं कुटुंब, त्याचं योगदान या साºयाविषयी किती पे्रमानं आणि संयमानं त्यांनी मला समजावून सांगितलं!
त्यांचंच बोट धरून राजकारणाचे पहिले धडे मी गिरवले. आपल्या देशाचा वैभवशाली इतिहास आणि आपल्या महान संस्कृतीची ओळख करून घेण्याची दृष्टीही त्यांनीच मला दिली.
इंदिरा गांधी ह्या बहुआयामी होत्या. त्याची मुळं त्यांच्या जडणघडणीत दिसतात. इंदिरा गांधी स्वत: अशा वातावरणात व परिस्थितीत वाढल्या, ज्या वेळी स्वातंत्र्य चळवळीचं वारं देशात सुरू होतं, फाळणीसारख्या घटनांमुळे प्रक्षोभ माजला होता आणि मनामनांत संशयकल्लोळ दाटलेला होता.. या साºयाच गोष्टींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला.
अनेक गोष्टींच्या त्या साक्षीदार होत्या. ऐश्वर्याचा अनुभव जसा त्यांनी घेतला तसाच त्यागाचाही घेतला. अतिव समाधान जसं त्यांच्या वाट्याला आलं, तसंच वंचित्वाच्याही त्या धनी ठरल्या. अतिव दु:ख सोसल तसंच अत्यानंदाच्या घटनांच्याही त्या साक्षीदार होत्या.
तरुण वयात आईचं आजारपण, नंतर निधन, वाढत्या, सजग वयातला इंदिराजींचा स्वत:चा संघर्ष, एकाकीपण, हरवलेपण.. या साºयाच गोष्टी त्यांच्या मन:पटलावर कोरल्या गेल्या. त्यांना हा अनुभव इतरांच्या दु:खाबाबतही संवेदनशील करून गेला. आपल्या विचारांवर त्या जशा ठाम होत्या, तसंच आपली मतं आपण दुसºयावर लादत तर नाही ना, याविषयी त्या दक्ष होत्या. मात्र काही गोष्टींसाठी त्या आग्रहीही होत्या. मी त्या वेळी माझ्या पहिल्या मुलाच्या प्रतीक्षेत होते. दूध व पालकच्या भाजीचा मला कंटाळा होता, पण या गोष्टी घ्याव्यात यासाठी त्यांचा ममतेचा आग्रहही त्या काळात मला अनुभवायला मिळाला.
प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्यांची विशिष्ट अशी नजर होती. दर्जा, जातपात, पंथ आणि संप्रदायावरून भेदाभेद करणं त्यांना मान्य नव्हतं. चमकधमक व भडकपणात रस नव्हता. ढोंगीपणा, खोटेपणा, लांडीलबाडी, कपट आणि दांभिकपणा या गोष्टींचा त्यांना तिटकारा होता आणि कोणी अशा गोष्टी करीत असेल तर त्यांच्या नजरेच्या कचाट्यातून ते सुटतही नसे.
इंदिरा गांधी यांच्यातल्या उदात्त, थोर आणि त्याचवेळी नि:स्वार्थी राष्टÑाभिमानाची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू आणि अर्थातच इंदिराजींना अतिशय जवळचे असणारे बापू (गांधीजी)... या साºयांमुळे प्रखर राष्टÑभक्ती त्यांच्या नसानसांत रुजली. त्यांचं राष्टÑीयत्व सर्वसमावेशक होतं. इतरांविषयीची अनुकंपा, कणव आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानातून रुजलेलं हे राष्टÑीयत्व होतं. याचमुळे एकाच वेळी त्या प्रखर स्वाभिमानी भारतीय होत्या, तर दुसरीकडे अखिल जगाच्या नागरिक! त्यातूनच त्यांचा दृष्टिकोन विशाल आणि सहनशील बनलेला होता.
एकाच वेळी अनेक गोष्टींत त्यांना रस होता. विविध संस्कृतींबद्दल जिज्ञासा होती. वाचन अफाट होतं. विविध लोकांशी संवाद होता. लेखक, कलावंत, विविध चळवळीतील कार्यकर्ते या साºयांशीच त्यांचं सख्य होतं. सर्वसामान्य जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
अन्याय, अत्याचाराला थारा न देणारा, त्यावर कठोरपणे हल्ला करणारा आणि कुठल्याही कठीण प्रसंगात न डगमगणारा असा एक करारी चेहराही त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्त्वामागे होता. त्यांच्या कार्यकाळात सुरुवातीला देशावर आर्थिक संकट होतं, पण त्यावर मात करण्यात त्यांना यश आलं. मानवी इतिहासातला निर्वासितांचा सर्वात मोठा प्रश्नही त्यांनी अत्यंत जबाबदारीनं सोडवला. इंदिरा प्रियदर्शिनी गांधी या अशा असामान्य व्यक्तिमत्त्व होत्या, ज्यांनी या देशाच्या मातीला आकार दिला. त्यांच्या कर्तृत्वाची थोरवी कशानंही मापता येणार नाही, तरीही त्यांना टीकेला सामोरं जावं लागलंच. त्यांच्या कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष करताना त्यांंना असमर्थ, कमकुवत म्हटलं, काहींनी जुलमी आणि अनियंत्रित सत्ताधीशही ठरवलं, पण ज्या समर्पणाच्या भावनेनं त्यांनी जनसेवेला वाहून घेतलं आणि प्राणाचंही बलिदान दिलं, त्याला सर्वसामान्य लोकांनी दृढविश्वासानं कायमच उचलून धरलं. कारण त्यांचं स्थान लोकांच्या मनात होतं. इंदिरा गांधी म्हणजे चालताबोलता इतिहास होत्या. त्यांनी देशाला कोणता वारसा दिला, याविषयीची चर्चा अभ्यासक आणि विश्लेषक भविष्यातही चालू ठेवतील, पण त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात इंदिरा गांधी खरोखरच कोण आणि काय होत्या, हे जनतेला खºया अर्थानं कळेल अशी माझी इच्छा आणि विश्वासही आहे. .
(इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केलेल्या भाषणाचा सारांश)