मां तुझे सलाम! मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाला आईने दिलं नवजीवन; किडनी देऊन वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:49 PM2023-07-17T12:49:35+5:302023-07-17T12:50:30+5:30
मुलगा अडचणीचा सामना करत असताना आईने पुढे येऊन त्याला नवजीवन दिलं.
आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मुलांच्या रक्षणासाठी आई आपल्या जीवाशी खेळते. म्हणूनच असे म्हणतात की आईच्या प्रेमापेक्षा या जगात काहीही मोठे नाही. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे मुलगा अडचणीचा सामना करत असताना आईने पुढे येऊन त्याला नवजीवन दिलं
बलौदाबाजारच्या 37 वर्षीय मुलाची किडनी खराब झाल्याची माहिती समोर आली होती. मुलाचा जीव वाचवण्यासाठी किडनी प्रत्यारोपण हाच पर्याय होता. अशा परिस्थितीत मुलाचा जीव वाचवण्यासाठी आई किडनी दान करण्यासाठी पुढे आली. रायपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आता किडनी प्रत्यारोपणानंतर आई आणि मुलगा पूर्णपणे निरोगी आहेत.
रुग्णाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने नोव्हेंबरमध्ये एम्सच्या नेफ्रोलॉजी आणि यूरोलॉजी विभागात रेफर करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होती की आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागले. हात-पायांवर सूज आणि अशक्तपणामुळे रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याचे पाहून डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला.
रुग्णाच्या आईने किडनी दान करून मुलाचे प्राण वाचवले. 11 जुलै रोजी झालेल्या ऑपरेशननंतर दोघेही आता निरोगी असून डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. सुमारे चार तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये एम्सच्या डॉक्टरांनी किडनीचे प्रत्यारोपण केले. यापूर्वी पीजीआय लखनऊच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पाच किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.